T20 World Cup, Prize money for Team India : भारतीय संघ उद्या मायदेशी परतणार, जाणून घ्या किती बक्षीस रक्कम सोबत घेऊन येणार, पाकिस्तान कोट्याधीश होणार!

T20 World Cup, Prize money for Team India : भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचा साखळी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

T20 World Cup, Prize money for Team India : भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचा साखळी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. नामिबियाविरुद्धचा हा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळायचा आहे. भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान रविवारीच संपुष्टात आले. १९९२नंतर प्रथमच आयसीसी स्पर्धेत अखेरचा साखळी सामना खेळण्यापूर्वी टीम इंडियावर गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली आहे.

पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्याकडून हार पत्करल्यानंतर टीम इंडियाचे आव्हान संपल्यातच जमा होती. पण, अफगाणिस्तान व स्कॉटलंडवर दणदणीत विजय मिळवून टीम इंडियानं नेट रन रेट प्रचंड सुधारला अन् होप्स कायम राखल्या. मात्र, अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या लढतीच्या निकालानं भारतीयांच्या आशा मावळल्या. किवींनी दमदार विजय मिळवून ग्रुप २मधून पाकिस्तानसह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांच्यासह सपोर्ट स्टाफचा हा टीम इंडियासोबतचा शेवटचा सामना आहे. कोहली यापुढे ट्वेंटी-२०त टीम इंडियाचा कर्णधार राहणार नाही , तर शास्त्री अँड टीमचा कार्यकाळ आज संपतोय. त्यामुळे आजचा सामना जिंकून या सर्वांना विजयी निरोप देण्याचा सहकाऱ्यांचा इरादा आहे.

कर्णधार म्हणून एकतरी आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे विराटचे स्वप्न अधुरेच राहिले. २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, २०१९ची वन डे वर्ल्ड कप सेमी फायनल आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल इथवरच विराटला प्रवास करता आला. त्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये तर साखळी फेरीतच त्याला हार मानावी लागली.

साखळी फेरीतील अपयशानंतर आता टीम इंडियाला आर्थिक फटकाही बसला आहे. आयपीएल मध्ये कोट्यवधी कमावणारे हे खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत लाखाच्या घरातच अडकले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या संघानं जास्त बक्षीस रक्कम जिंकली.

आयसीसीनं जाहीर केलेल्या बक्षीस रकमेनुसार विजेत्या संघाला १२.२ कोटी, उपविजेत्याला ६.०१ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. उपांत्य फेरीतील पराभूत दोन संघांना प्रत्येकी ३ कोटी दिले जातील. आता या कोट्यवधींच्या शर्यतीतून टीम इंडिया बाद झालीय... पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांना आता कोटीच्याकोटींची उड्डाणं घेता येणार आहेत.

आयसीसीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी ४२.०७ कोटींची बक्षीसं जाहीर केली आहेत. सुपर १२ मध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला विशिष्ट रक्कम ठरवली गेली आणि त्यानुसार ९.०१ कोटींची एकूण बक्षीस रक्कम वितरीत केली गेली. Super 12मधीय प्रत्येक विजयाला ३० लाख रुपये बक्षीस म्हणून दिले गेले.

त्यानुसार भारतीय संघानं आजचा सामना जिंकल्यास प्रती विजय ३० लाख यानुसार त्यांना ९० लाख रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. पाकिस्ताननं पाच सामने जिंकून १.५० कोटी रुपये कमावले आहेत. आता त्यांचे लक्ष्य विजेत्या संघासाठीच्या १२ कोटींच्या बक्षीसाकडे आहे. Super 12 मध्ये बाद होणाऱ्या संघांमध्ये सर्वाधिक बक्षीस रक्कम ही दक्षिण आफ्रिकेनं जिंकली आहे. त्यांनी ४ सामने जिंकून १.२० कोटी कमावले.

Read in English