जागतिक क्रिकेटमधील सर्वात रोमहर्षक सामना म्हणजे भारत - पाकिस्तान लढत. रविवार, २४ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकात हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. येथे सर्वाधिक चर्चा याच सामन्याची आहे.
यूएईत भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी असल्याने प्रत्येकाला लाईव्ह सामना पाहण्याची उत्कंठा आहे. या सामन्याची तिकिटे मात्र आधीच संपली. काल अर्ध्या तासात तिकीट मागणारे १३ हजार वेटिंगवर होते. हॉटेल आणि रेस्टॉरेंटदेखील हाऊसफुल्ल झाली आहेत.
सर्वसामान्य ते कोट्यधीश हे देशाशी भावनात्मकरित्या जुळल्याने सामन्यानिमित्त दुबईचे सर्व टूर पॅकेजेस् हातोहात विकले गेले. सामना पाहण्यासाठी अमेरिका आणि कॅनडातून लोक येत आहेत.
दुबईतील नामांकित ‘दादाभाई’ या ट्रॅव्हल कंपनीने सामन्यानिमित्त तिकिटांसह एक रात्र स्टे करण्यासाठी ५०० पॅकेज उपलब्ध केले होते. ते विकल्याची माहिती कंपनीने दिली.
एका पॅकेजची किंमत ४० हजार ७०० (२ हजार दिरहम) आहे. दुसरीकडे स्थानिक रेस्टॉरेंट आणि बारमध्ये पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ऑफर ठेवण्यात आल्या आहेत. सर्वत्र मेन्यूमध्ये मात्र क्रिकेटची ‘छाप’ दिसते. उदा. जेवणाचा सेंच्युरी पॅक, फिक्स्ड ओव्हर मेन्यू! अनेक हॉटेल्समध्ये फुड डिलिव्हरीची सोयदेखील उपलब्ध आहे. घरी बसल्याबसल्या सामन्याचा आनंद घेणाऱ्या लोकांना आवडते पदार्थ पाठविण्याची सर्वत्र तयारी दिसते.
भारत - पाक सामन्याची तिकीट विक्री सुरु होताच सर्व तिकिटे काही मिनिटात संपली. नंतरच्या अर्ध्या तासात १३ हजारावर वेटिंग होते. ज्यांना तिकिटे उपलब्ध झाली, ते चार-पाच पटीने अधिक रकमेची मागणी करत ती विकत आहेत.
काही कंपन्यांनी तर कर्मचाऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून शंभर तिकिटे उपलब्ध करुन दिली. जे कर्मचारी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊ शकणार नाहीत, ते कंपनीत सामना पाहू शकतील, अशी मुभा देण्यात आली आहे.
दुबईतील कानू ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक अफझल आझम यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकानिमित्त भारतातून तिकीट बुकिंग आणि हॉटेल बुकिंगसाठी मागणी अचानक वाढली. दुबई एक्स्पोमुळे आधीच दुबईतील हॉटेलमध्ये जागा शिल्लक नाही. विश्वचषकाचे उपांत्य सामने आणि अंतिम सामन्यापर्यंत ही मागणी आणखी जोर धरू शकते.
या सामन्याचे थेट प्रक्षेपण करणारे ब्रॉडकास्टर २४ ऑक्टोबर रोजी १०-१० सेकंदांची जाहिरात दाखविण्यासाठी २५ ते ३० लाख रुपये आकारत आहेत. भारतीय टीव्हीवर क्रीडा आयोजनादरम्यान आकारण्यात येणारे हे सर्वाधिक दर ठरले.
अनेक स्लॉट बुकदेखील झालेत. आधी या स्लॉटची किंमत साडेनऊ लाख होती. स्टार वाहिनीने स्टार स्पोर्ट्ससाठी विश्वचषकाचे प्रसारण हक्क ९०० कोटीला आणि डिझ्नी- हॉटस्टारने २७५ कोटी रुपयांत विकत घेतले आहेत.