संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित झालेल्या टी-२० विश्वचषकाचे काल रात्री सूप वाजले. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद पटकावले. या विश्वचषकात षटकार-चौकारांची बरसात झाली, तसेच धडाधड विकेट्सही पडले. आता या विश्वचषकात घडलेल्या विक्रमांची संपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे.
या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघातील एकाही खेळाडूला फलंदाजी, गोलंदाजीत अव्वल ५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. केवळ सामन्याचा एका डावात सर्वाधिक धावा फटावण्याची विक्रम वगळता कुठलाही विक्रम भारतीय संघाला करता आला नाही.
यंदाच्या टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा मान पाकिस्तानच्या बाबर आझमने ३०३ धावा फटकावत मिळवला. तसेच विश्वचषकात सर्वाधिक ४ अर्धशतकेही बाबर आझमनेच ठोकली. सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज पुढीलप्रमाणे - बाबर आझम (३०३), डेव्हिड वॉर्नर (२८९), मोहम्मद रिझवान (२८१), जोस बटलर (२६९), सी. असलंका (२३१). भारताकडून सर्वाधिक १९४ धावा लोकेश राहुलने केल्या.
या विश्वचषकात एकूण ५२६ विकेट्स पडले. त्यातील सर्वाधिक बळी श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने टिपले. त्याने एकूण १६ बळी घेतले. सर्वाधिक बळी घेणारे टॉप ५ गोलंदाज पुढीलप्रमाणे आहेत. वानिंदू हसरंगा (१६ बळी), अॅडम जॅम्पा (१३ बळी), ट्रेंट बोल्ट (१३ बळी), जोश हेझलवूड (११ बळी), शाकिब अल हसन (११ बळी). भारताकडून सर्वाधिक ७ बळी जसप्रीत बुमराहने घेतले.
या विश्वचषकात एकूण ४०५ षटकार ठोकले गेले. त्यातील सर्वाधिक १३ षटकार जोस बटलरने ठोकले. तसेच एका डावात सर्वाधिक नाबाद १०१ धावा करण्याचा विक्रमही जोस बटलरनेच नोंदवला.
या विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक फटकावण्याचा मान पाकिस्तानच्या शोएब मलिकने पटकावला. त्याने १८ चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळी केली.
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक निर्धाव षटके हसन अलीने टाकली. त्याने स्पर्धेत दोन निर्धाव षटके टाकली. तर स्पर्धेत सर्वाधिक ८५ निर्धाव चेंडू टिम साऊदीने टाकले.
या स्पर्धेत सर्वाधिक निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने एका डावात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात २ बाद २१० धावा फटकावल्या.
तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा फटकावल्या गेल्या. या सामन्यात ३६८ धावा फटकावल्या गेल्या.
या विश्वचषकात सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियन संघाने मिळवले. त्यांनी ७ पैकी ६ सामने जिंकले. तर सर्वाधिक पराभव बांगलादेशचे झाले. बांगलादेशने ८ पैकी ६ सामने गमावले.
तर टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाने केला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडने दिलेले १७३ धावांचे आव्हान पार करत हा विक्रम केला.