IND vs AUS : "सूर्यकुमारबद्दल सहानुभूती आहे पण...", भारतीय दिग्गजाने संजू सॅमसनसाठी केली 'बॅटिंग'

suryakumar yadav odi : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन डे मालिकेत फ्लॉप ठरल्यामुळे सूर्यकुमार यादवच्या खेळीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वन डे सामना जिंकून पाहुण्या कांगारूच्या संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. मात्र, रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात कांगारूच्या संघाने मोठा विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव दोन्हीही सामन्यात एकही धाव न करता तंबूत परतला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज चीतपट झाल्याचे पाहायला मिळाले.

पहिल्या सामन्यात सोप्या (188) आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने एकापाठोपाठ पाच गडी गमावले होते. मात्र, लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी 108 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणले.

राहुल आणि जडेजाच्या जोडीमुळे भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला. मात्र, दुसऱ्या सामन्यात कांगारूच्या संघाने 10 गडी राखून मोठा विजय मिळवला. हा भारताचा घरच्या मैदानावरील सर्वात मोठा पराभव आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 26 षटकांत सर्वबाद फक्त 117 धावा केल्या. मिचेल स्टार्क (5), सीन अबॉट (3) आणि नॅथन एलिस (2) यांच्या भेदक माऱ्याने भारतीय फलंदाजीची कंबर मोडली.

118 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने स्फोटक खेळी करत मोठा विजय मिळवला. अशातच सूर्यकुमार यादवच्या वन डे सामन्यातील सततच्या खराब कामगिरीमुळे माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने एक मोठे विधान केले आहे.

सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात यावे आणि संजू सॅमसनला वनडे संघात संधी द्यावी, असे त्याने म्हटले आहे. वसीम जाफरच्या मते, सूर्यकुमार यादवच्या जागी संजू सॅमसनला संधी देणे हा वाईट पर्याय ठरणार नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फोवर बोलताना जाफरने म्हटले, "मला सूर्यकुमार यादवबद्दल सहानुभूती आहे, कारण त्याने पहिला चेंडू 145 च्या वेगाने खेळला होता. डावखुरा गोलंदाज जेव्हा चेंडू आत आणतो तेव्हा अडचण येते यात शंका नाही."

"सूर्यकुमार यादवने यादवने याचा अंदाज घ्यायला हवा होता. गोलंदाज स्टम्पला लक्ष्य करेल आणि कदाचित स्विंगही करेल. तिसर्‍या वन डे सामन्यात व्यवस्थापन त्याला संधी देते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे."

तसेच जर सूर्यकुमारला पुन्हा संधी मिळणार नसेल तर संजू सॅमसन हा वाईट पर्याय नाही. कारण त्याला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने उत्तम काम केले आहे, असे वसीम जाफरने अधिक म्हटले.