SuryaKumar Yadav Struggle Story: भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकात देखील भारतीय स्टार फलंदाजाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सूर्याच्या बॅटमधून 225 धावा आल्या आहेत. 3 अर्धशतकी खेळीच्या जोरावर सूर्याने एका वर्षात 1000 धावा करण्याच्या विक्रमाला देखील गवसणी घातली आहे. झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात त्याने 25 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
सुर्यकुमार यादव सध्या आयसीसी टी-ट्वेंटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी चांगली कामगिरी करुनही भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सुर्यकुमार यादवला प्रचंड राग आला होता, असा खुलासा त्याचे वडील अशोक कुमार यादव यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
दोन वर्षांपूर्वी माझ्या मुलाला टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्याने तो निराश झाला होता. त्याला प्रचंड राग आला होता. त्यानंतर आयपीएलचे सामने यूएईमध्ये खेळवले गेले. यात विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स होती. मात्र या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. सूर्याचे नाव संघात नव्हते. त्यावेळी तो खूप दु:खी होता. त्यावेळी त्याने रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध सुमारे 184 च्या स्ट्राइक रेटने 43 चेंडूत 79 धावा केल्या. 10 चौकार आणि 3 षटकार मारले, असं अशोक कुमार यांनी सांगितले.
सूर्याचे नाव आज आकाशात चमकत असेल, पण त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्याचा कौटुंबिक मूल्यांवर खूप विश्वास आहे, असं त्याच्या वडिलांनी सांगितले. तसेच सूर्याला लहानपणापासूनच आईशी सर्वात जास्त ओढ होती. आजही तो मॅचसाठी मैदानावर जाण्यापूर्वी टीम बसमध्ये हजर असतो आणि तिथून तो आईला फोन करतो, तिचे आशीर्वाद घेतो. सामना संपल्यानंतरही तो घरी परतत असताना तो पुन्हा आईला फोन करून आपल्या खेळीबद्दल सांगतो, असं सुर्यकुमारच्या वडिलांनी सांगितलं.
सुर्यकुमारच्या प्रशिक्षकाने मला सांगितले की, तुझा मुलगा खूप हुशार आहे. तो नक्कीच काहीतरी करेल. त्यानंतर मी माझ्या मुलाला कधीच थांबवले नाही. किमान तो रणजी ट्रॉफी खेळेल आणि तसे झाले तर नोकरी मिळेल हे त्याला माहीत होते. आज त्याने जे केले आहे, मग आपल्यापेक्षा जास्त आनंदी कोण असेल. त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.