रोहित शर्माप्रमाणेच कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले दिग्गज भारतीय क्रिकेटर कसोटी पाठोपाठ बीसीसीआयने आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माच वनडेचा कॅप्टन असेल, अशी चर्चा रंगत असताना त्याला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आले. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्प्लिट कॅप्टन्सी पॅटर्न नको अर्थात सर्व प्रकारात एकाच कर्णधार असावा, हा विचार करून रोहितच्या जागी गिलकडे एकदिवसीय क्रिकेटची जबाबादारी दिल्याचे म्हटले आहे.
रोहित शर्मा हा काही अचानक कर्णधारपद काढून घेतलेला पहिला खेळाडू नाही. याआधीही अनेक दिग्गजांवर ही वेळ आली आहे. इथं एक नजर टाकुयात या यादीत कोणते दिग्गज खेळाडू आहेत त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
लिटल मास्टर सुनील गावसकर यांचे भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान राहिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजारीचा पल्ला गाठणाऱ्या या दिग्गजाला १९७८-७९ मध्ये कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४७ कसोटी सामन्यात ९ विजय आणि ३७ एकदिवसीय सामन्यात १४ विजय नोंदवले. ESPN Cricinfo च्या माहितीनुसार, त्यांचे विनिंग पर्सेंटेज हे १९ इतके असले तरी त्या काळात गावसकर हे प्रभावी कर्णधार होते. पण १९७९ मधील इंग्लंड दौऱ्याआधी त्यांची कॅप्टन्सी गेली. २०२० ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी कॅप्टन्सीवरून काढण्यामागे राजकारण होते, असे स्पष्ट मत मांडले होते.
गावसकरांच्या नंतर भारतीय संघाचे नेतृत्व हे कपिल देव यांच्याकडे आले. १९८३ मध्ये भारतीय संघाने कपिल पाजींच्या नेतृत्वाखालीच पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. पण त्याआधी पुन्हा आश्चर्यकारकरित्या कपिल पाजींच्या जागी गावसरांकडे कॅप्टन्सी सोपण्यात आली होती. १९८३ च्या वनडे वर्ल्ड स्पर्धेला ६ महिने बाकी असताना पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी कपिल पाजींकडे सोपवण्यात आली होती. पुन्हा गावसर आणि १९८४-८५ मध्ये गावसरांनी स्वत कॅप्टन्सी सोडल्यावर पुन्हा कपिल देव यांच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
मोहम्मद अझरुद्दीन हा देखील भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. पण मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्यामुळे त्याला कॅप्टन्सीच नाही तर संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीची कारवाई झाल्यानंतर काही वर्षांनी कोर्टाने बंदी हटवली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
सौरव गांगुली हा भारतीय संघ बांधणी करणारा कर्णधार म्हणून ओळखला जातो. २००५ मध्ये गांगुली आणि तत्कालीन कोच ग्रेग चॅपल यांच्यातील वाद चांगलाच गाजला. गांगुलीच्या जागी राहुल द्रविडकडे नेतृत्व सोपवण्यात आले. गांगुलीनं २००६ मध्ये संघात कमबॅक केलं, पण तो खेळाडूच्या रुपातच निवृत्त झाला.
राहुल द्रविड नेतृत्वात छाप सोडण्यात कमी पडला. त्याच्या कॅप्टन्सीमध्ये २००७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत संघावर साखळी फेरीत गारद होण्याची वेळ आली अन् महेंद्रसिंह धोनीच्या रुपात टीम इंडियाला नवा कर्णधार मिळाला.
महेंद्रसिंह धोनीनं यशस्वी कर्णधाराच्या रुपात खास छाप सोडली. त्याच्यानंतर २०१४-१५ मध्ये विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व आले. २०२१ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कोहलीनं टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याची वनडेत कॅप्टन्सी करण्याची इच्छा असताना त्याच्या जागी रोहित शर्माकडे टी-२-०सह वनडेचं नेतृत्व देण्यात आले.