ICC T-20 वर्ल्ड कप स्पर्धेत UAE टीमला पहिला विजय मिळवून देण्यात शोहेब खानचं महत्त्वाचं योगदान राहिले. बिहारच्या गया येथे जन्मलेल्या शोहेबने कॅनडाविरोधात जबरदस्त कामगिरी केली. आर्यांश शर्मासोबत मिळून शोहेबने विजयी खेळी केली.
शोहेब खानला जेव्हा बिहारच्या रणजी टीमकडून खेळण्याची संधी मिळाली नाही तेव्हा त्याने UAE ला जाण्याचा निर्णय घेतला. कधीकाळी क्रिकेट सोडण्याचा विचार करणाऱ्या शोहेबच्या आयुष्याला मित्राच्या एका सल्ल्याने कलाटणी मिळाली.
१३ फेब्रुवारीला कॅनडाविरोधात १५१ धावांचा पाठलाग करताना UAE टीम ६६ धावांवर ४ विकेट गमावून बसली होती. मॅच हातातून जाणार हेच सगळ्यांना वाटत होते. तेव्हा शोहेब खानने मोर्चा सांभाळला आणि अवघ्या २९ चेंडूत ५१ धावांची स्फोटक खेळी केली. पाहता पाहता पराभवाच्या सावटातून विजयाच्या दिशेने UAE टीमची वाटचाल सुरू झाली.
UAE टीमचा हा फक्त एक विजय नव्हता तर त्यात एका अशा खेळाडूचे पुनरागमन होते ज्याने एकेकाळी याच दिल्ली शहरात मोठी स्वप्ने पाहिली होती. ३ दिवसानंतर दिल्लीत अफगाणिस्तानसोबत त्याच आत्मविश्वासाने UAE टीम उतरली. त्या सामन्यात शोहेब खानने ४८ चेंडूत ६८ धावा केल्या. सलग २ अर्धशतके आणि तेही टी २० वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत, त्यामुळे या २७ वर्षीय फलंदाजाने अवघ्या जगाचे लक्ष वेधले.
शोहेबचा जन्म बिहारच्या गया येथे झाला. जिथे क्रिकेटसाठी काहीच सुविधा नव्हती. लहानपणापासून त्याने मोठ्या भावाला खेळताना पाहिले. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये सचिन आणि सहवान यांच्या आक्रमक फलंदाजीने शोहेब आकर्षित झाला होता. परंतु त्याची खरी प्रेरणा महेंद्र सिंह धोनी बनला. १४ व्या वर्षी शोहेब दिल्लीत आला. याठिकाणी जामिया मिल्लिया इस्लामियाशी जोडत त्याने क्रिकेटची सुरुवात केली.
टेनिस बॉल ते लेदर बॉलपर्यंत हा प्रवास सोपा नव्हता. २०१७ साली बिहारच्या रणजी आणि विजय हजारे ट्रॉफीपर्यंत पोहचला परंतु अंतिम निवडीवेळी चूक झाली. कायम स्वप्नाचा पाठलाग करून दरवाजापर्यंत पोहचत होता परंतु नशिबाचे दार कधी उघडले नाही. २०२० साली कोरोना महामारीने क्रिकेट थांबले. २०२१ साली शोहेबचं लग्न झाले आणि त्याच्यावरची जबाबदारी वाढली.
आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एका मित्राच्या सल्ल्यावरून शोहेबने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी दिवसा नोकरी आणि रात्री क्रिकेट असा त्याचा प्लॅन होता. दुबईत गेल्यानंतर शोहेबचा संघर्ष सुरू झाला. कधी सेल्सची नोकरी, कधी रिअल इस्टेट, कधी ट्रॅव्हल एजन्सी तर कधी फायनॅन्शियल कंसल्टेंट म्हणून दिवसा काम केले आणि रात्री नेटमध्ये क्रिकेट प्रॅक्टिस केली.
जवळपास २ वर्ष शोहेबचा हा दिनक्रम सुरू होता. अखेर त्याच्या मेहनतीला यश आले. Emirates Cricket Board च्या घरगुती क्रिकेट सामन्यातील शोहेबच्या खेळीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आणि राष्ट्रीय टीमसाठी दरवाजा उघडला. नुकतेच झालेल्या लग्नानंतर पत्नीला भारतात सोडून दुबईत जाणे कठीण होते. परंतु शोहेबने या परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी आणि क्रिकेटचा छंद दोन्ही जोपसला.
६ महिन्यापूर्वी शोहेबच्या घरी मुलीने जन्म घेतला आणि त्याच काळात त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे मुलीला ते लकी चार्म मानतात. यूएईचे कॅप्टन मोहम्मद वसीम हे शोहेबला महत्त्वाचा भाग समजतात. आज बिहारच्या एका छोट्या गावातून पुढे येत शोहेबने संघर्ष आणि हिंमतीने यशाचे शिखर गाठले आहे.
गया येथील धुळीने माखलेल्या मैदानांपासून ते दुबईतील कॉर्पोरेट कार्यालयांपर्यंत आणि नंतर विश्वचषकाच्या चमकदार मंचापर्यंत...शोहेब खानची कहाणी फक्त क्रिकेटची नाही, तर ती चिकाटी, त्याग आणि जिद्दीची आहे. जर स्वप्न खरे असेल तर संघर्ष दीर्घ काळ असू शकतो परंतु यश नक्कीच मिळते हे दाखवून देणारे आहे.