तीन वर्ष विराट कोहलीची ( Virat Kohli) बॅट त्याच्यावर रुसली होती... धावांचा ओघ जणू आटलाच होता... सत्तरवरून ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी १०००+ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली... याच दरम्यान विराट कोहलीने तीनही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडलं... असं असलं तरी आर्थिक प्रगतीत विराट 'एकटा टायगर' असल्याचे समोर आले.
आशिया चषक २०२२ स्पर्धेत विराटने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. आशिया चषक २०२२ मध्ये भारताकडून सर्वाधिक २७६ धावा त्याने केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील निर्णायक तिसऱ्या सामन्यातही विराटची बॅट तळपली. आता तो दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर विराटच्या कामगिरीचा आलेख चढ-उतारांचा राहिला तरी आर्थिक प्रगतीचा आलेख चढाच राहिलाय... Hopperhq ने जाहीर केलेल्या माहितीत हे समोर आले आहे. Hopperhqने इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील सेलिब्रेटिंची नावे जाहीर केली आणि त्यात टॉप १५ मध्ये एकमेव भारतीय म्हणून विराटने मान पटकावला.
विराट कोहलीचेट्विटरवर ५० मिलियन म्हणजेच ५ कोटींच्यावर फॉलोअर्स झाले आहेत. ट्विटरवर इतके फॉलोअर्स असलेला विराट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. इंस्टाग्रामवरही त्याचे २११ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर फेसबूकवर ही संख्या ४९ मिलियन इतकी आहे. सोशल मीडियावर विराटचे एकूण ३१० मिलियन फॉलोअर्स आहेत. आशिया चषक २०२२ स्पर्धेत विराटने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. पण, भारताला सुपर ४ मध्येच गाशा गुंडाळावा लागला. श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानला लोळवून जेतेपद पटकावले.
hopperhq ने २०२२ मधील इंस्टाग्रामची रिच लिस्ट जारी केली आहे. या ताज्या यादीमध्ये किंग कोहलीने मोठी झेप घेतली आहे. मागील वर्षी कोहली एक इंस्टाग्राम पोस्टसाठी ५ कोटी रूपये घेत होता आणि तो १८ व्या स्थानावर होता. मात्र २०२२ च्या ताज्या यादीमध्ये त्याने ४ पाऊलांनी मोठी झेप घेत १४ व्या स्थानावर मजल मारली आहे. तो प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टसाठी १०,८८,००० डॉलर म्हणजेच जवळपास ८.९ कोटी रुपये घेतो.
या यादीत कोहलीचा नंबर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी नंतर येतो. लक्षणीय बाब म्हणजे रोनाल्डो एका पोस्टसाठी १९.७१ कोटी रूपये आकारतो, तर मेस्सी एका पोस्टसाठी १४.२१ कोटी घेतो. hopperhq द्वारे जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये भारतीयांमध्येविराट कोहलीनंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नंबर लागतो. प्रियंका एका पोस्टसाठी ३.३८ कोटी रूपये घेते आणि ती या यादीमध्ये २७ व्या क्रमांकावर आहे.
अभिनेत्री कायली जेनर एका पोस्टसाठी १५ कोटी घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर मेस्सी, गायक सेलेना गोमेझ ( १४.२ कोटी), अभिनेता ड्वेन जॉन्सन ( १४ कोटी), किम कॅर्डशिएन ( १३.८ कोटी), एरियाना ग्रँड ( १३ कोटी), पॉप स्टार बेयाँसी ( ११.४ कोटी), शोए कॅर्डशिएन ( १०.८ कोटी), केंडल जेनर ( १०.५ कोटी) असा टॉप टेन सेलिब्रेटींचा क्रमांक येतो.