भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली सध्या चर्चेत आहेत. खरं तर जेव्हापासून ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्ष पदापासून पायउतार झाले तेव्हापासून ते माध्यमांपासून दूर आहेत.
सौरव गांगुली यांनी अनेकदा माध्यमांसमोर येणे टाळले आहे. मात्र, आता त्यांनी भारतात सुरू होत असलेल्या महिला प्रीमियर लीगबद्दल (WPL) एक मोठे विधान केले आहे. तसेच आपल्याच कार्यकाळात WPLचा निर्णय झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महिला खेळाडूंमध्ये खूप ताकद असून ही स्पर्धा केवळ 5 संघांपुरती मर्यादित नसावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
त्यांनी महिला प्रीमियर लीगबद्दल म्हटले, 'मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आम्ही त्याची योजना आखली होती. मी अध्यक्ष होतो, राजीव शुक्ला उपाध्यक्ष आणि जय शहा सचिव होते. याशिवाय आयपीएलचे विद्यमान चेअरमन अरुण धुमाळ यांचाही त्यात सहभाग होता.'
'त्यावेळी आम्ही नियोजन केले होते आणि आता ते जाहीर केले आहे. महिला आयपीएल माझ्यासाठी सरप्राइज नाही. आगामी काळात या लीगमध्ये 5 हून अधिक संघ सहभागी होऊ शकतात', असे गांगुली यांनी सांगितले.
तसेच त्यांनी विराट कोहलीच्या खेळीचे देखील कौतुक केले. 'विराट कोहली शानदार खेळी करत आहे. त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने कसोटीत देखील छाप सोडली आहे.'
'ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका विराट कोहलीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात व्हावी असे मला वाटते', अशी इच्छा गांगुलींनी यावेळी व्यक्त केली.
'भारतीय संघ खूप मजबूत आहे. आपल्या देशात खूप मुले क्रिकेट खेळत आहेत. बहुतांश खेळाडू असे देखील आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय संघात संधी मिळत नाही. मला वाटते की या संघाने विश्वचषक खेळावा. तसेच निवडकर्ते आणि राहुल द्रविड यांनी या संघाला विश्वचषकापर्यंत एकत्र ठेवायला हवे', असे गांगुली यांनी विश्वचषकाबाबत म्हटले.
या प्रश्नाचे उत्तर देणे गांगुली यांनी टाळले मात्र संघाला मोलाचा सल्ला दिला. त्यांनी म्हटले, 'टीम इंडियाला निर्भयपणे विश्वचषक खेळायचा आहे. त्यांना शांत राहावे लागेल.'
तसेच भारतीय संघातील सर्व खेळाडू खूप चांगले आहेत. या संघात शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी यांसारखे टॅलेंट आहेत. हा खूप मजबूत संघ आहे', असे त्यांनी अधिक म्हटले.