Shreyas Iyer Injury Update: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला. ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीच्या मागे धावताना अय्यरने एक शानदार झेल घेतला. मात्र, झेल घेताना तो पडला तेव्हा त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली.
श्रेयस अय्यर जमिनीवर आदळल्यानंतर वेदनेने तडफडत होता. दुखापत इतकी गंभीर होती की श्रेयस अय्यरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्तही समोर आले होते. त्यावर आता बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी टीओआयशी बोलताना म्हणाले, 'श्रेयसची प्रकृती झटपट सुधारतेय. जीवाचा धोका टळला आहे. त्याची प्रकृती डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. मी डॉक्टरांशी सतत संपर्कात आहे.'
'सामान्यपणे अशा प्रकारची दुखापत झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे बरे होण्यासाठी सहा ते आठ आठवडे लागतात. परंतु श्रेयस खूप झटपट रिकव्हर होतोय. डॉक्टर त्याच्या रिकव्हरीवर खूप समाधानी आहेत. श्रेयसने सामान्य दैनंदिन कामकाज सुरू केले आहे.'
'श्रेयसवर शस्त्रक्रिया झालीच नाही. ती वेगळी प्रक्रिया होती. श्रेयस अय्यरसंदर्भात एक प्रक्रिया करण्यात आली जी अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी करण्यात आली होती. म्हणूनच तो इतक्या लवकर बरा झाला.'
'श्रेयस अय्यरची दुखापत बरीच गंभीर होती. पण आता तो बरा झाला आहे आणि धोक्याबाहेर आहे. त्यामुळेच अय्यरला आयसीयूमधून त्याच्या साध्या खोलीत हलवण्यात आले आहे,' अशी माहिती सैकिया यांनी दिली.