सलगच्या दोन पराभवानंतर पाकिस्तानी संघ सोमवारी अफगाणिस्तानशी भिडणार आहे. वन डे विश्वचषकातील २२ वा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानला मागच्या दोन सामन्यांमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करून आपली गाडी विजयाच्या रूळावर आणण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आपली रणनीती काय असणार आहे याबाबात भाष्य केले आहे.
मागील दोन सामन्यांतील पराभवावर शाहीनने म्हटले, 'पराभव हा पराभव आहे आणि आम्हाला तो स्वीकारावा लागेल, पण यातून शिकणे संघासाठी अधिक चांगले होईल. हे दोन सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते, पण तरीही आम्ही स्पर्धेत जिवंत आहोत. आम्ही विश्वचषक जिंकून इतिहास रचण्यासाठी इथे आलो आहोत.'
स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली.
'विश्वचषकासारख्या स्पर्धेत कोणताच संघ तगडा किंवा बलाढ्य नाही. कारण इथे कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो, हे आम्ही आतापर्यंत पाहिले आहे. अफगाणिस्तानने देखील चांगले क्रिकेट खेळून इंग्लंडचा पराभव केला आहे', असेही शाहीनने सांगितले.
तसेच भारतात जास्त स्विंग होत नाही आणि इथे फिरकीपटूंना अधिक मदत मिळते. अफगाणिस्तानविरूद्ध आम्हाला आमचे सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागेल. त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत, अशा शब्दांत शाहीनने अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंना दाद दिली.
पाकिस्तानला उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी उरलेले सर्व पाच सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. एका सामन्यातील पराभवामुळे देखील पाकिस्तानचा खेळ बिघडू शकतो. उरलेले पाचही सामने जिंकल्यास पाकिस्तानचे एकूण गुण १४ होतील, ज्यामुळे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहील.
दरम्यान, पाकिस्तानने ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवल्यास देखील पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. कारण ४ सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानचे गुण १२ होतील. मात्र, त्यासाठी पाकिस्तानला आपल्या नेटरनरेटमध्ये सुधारणा करावी लागेल.