डे-नाईट कसोटीसाठी वापरण्यात येणाऱ्या गुलाबी चेंडूवरुन अनेक आक्षेप याआधी देखील घेण्यात आले होते. विशेषत: रात्री लाइट्समध्ये चेंडू दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या.
आता गुलाबी चेंडू तयार करणाऱ्या एसजी कंपनीनं एक मोठं विधान केलं आहे. गुलाबी चेंडूचा चमकदारपणा कमी करण्याचा विचार सुरू असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
भारताने अहमदाबादमध्ये झालेल्या डे-नाइट कसोटीत इंग्लंडवर १० विकेट्सने विजय प्राप्त केला. सामना केवळ दोनच दिवसांत संपला होता. भारतात खेळविला गेलेला हा दुसरा डे-नाइट कसोटी सामना होता. याआधी कोलकातामध्ये खेळविण्यात आलेला डे-नाइट सामना देखील लवकर आटोपला होता
भारतात कसोटी क्रिकेटसाठी एसजी कंपनीच्या चेंडूंचा वापर केला जातो. गुलाबी चेंडू देखील हीच कंपनी तयार करते. पण आता गुलाबी चेंडूत महत्वाचा बदल करण्याची तयारी सुरू केल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.
'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्रानं एसजी कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर पारस आनंद यांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार कंपनीनं गुलाबी चेंडूत बदल करण्यावर काम सुरू केलं आहे. चेंडूचा रंग टिकून राहण्यासाठी एका खास प्रणालीचा वापर केला जातो. नव्या तंत्रानुसार चेंडूचा चमकदारपणा देखील कमी होणार आहे. चेंडुवरील चमकदारपणामुळे खेळपट्टीवर चेंडूला वेग मिळतो, असं सांगण्यात येत आहे.
बांगलादेश विरोधातील खेळला गेलेला डे-नाइट कसोटी सामना देखील अडीच दिवसांत संपला होता. पण त्यावेळी कोणतीही तक्रार पुढे आली नव्हती. अहमदाबाद कसोटीनंतर गुलाबी चेंडूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
'कोलकाता डे-नाइट कसोटी लवकर संपल्यानंतर गुलाबी चेंडूबाबत तक्रार समोर आली होती. पण आता अहमदाबाद कसोटी देखील दोनच दिवसांत संपल्यानंतर यावर गांभीर्यानं विचार केला जात आहे. मालिका संपल्यानंतर आम्ही बीसीसीआयशी संपर्क साधणार आहोत', असं एसजी कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर पारस आनंद म्हणाले.