Asia Cup:या ५ फलंदाजांनी आशिया चषकात केल्या सर्वाधिक धावा; २ भारतीयाचांही समावेश

आशिया चषक २०२२ चा थरार २७ ऑगस्टपासून यूएईच्या धरतीवर रंगणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरूद्ध २८ तारखेला खेळेल. आशिया चषकाचा किताब भारताने सर्वाधिक वेळा जिंकला आहे.

आशिया चषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. जयसूर्याने या स्पर्धेत २५ सामन्यांमध्ये १,२२० धावा करून ही किमया साधली आहे. यादरम्यान त्याची सरासरी ५३ हून अधिक राहिली आहे. तसेच या बहुचर्चित स्पर्धेत जयसूर्याच्या नावावर ६ शतके आणि ३ अर्धशतकांची नोंद आहे. विशेष म्हणजे जयसूर्या एकमेव असा खेळाडू आहे ज्याने जागतिक क्रिकेटमध्ये १०,००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि एका क्रिकेट प्रकारात ३०० बळी पटकावले आहेत.

या यादीतील दुसऱ्या क्रमांकावर देखील श्रीलंकेच्याच खेळाडूची नोंद आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आशिया चषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्थित आहे. संगकाराने २४ सामन्यांमध्ये ४८ च्या सरासरीनुसार १,०७५ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतकी आणि ८ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे.

क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत नसेल असे होऊ शकत नाही. मराठमोळ्या सचिनने आशिया चषकात ९७१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावणारा सचिन आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू आहे.

या यादीत एका पाकिस्तानी खेळाडूचा देखील समावेश आहे. पाकिस्तानच्या दिग्गज शोएब मलिकने आशिया चषकात २१ सामन्यांमध्ये ९०७ धावा करून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. मलिकने आशिया चषकात एकूण ३ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली आहेत. एक प्रभावी अष्टपैलू खेळाडू म्हणून शोएब मलिकची ओळख आहे. तसेच त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० हून अधिक बळी घेतले आहेत.

आशिया चषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाचव्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहितने २७ सामन्यांमध्ये ८८३ धावा करून इथपर्यंत मजल मारली आहे. एक शतक आणि ७ अर्धशतकी खेळी करून रोहितने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे यंदाच्या आशिया चषकासाठी रोहित भारतीय संघाचा कर्णधार आहे, त्यामुळे या यादीत मोठी झेप घेण्याची त्याच्याकडे संधी असेल. रोहितची एक शतकीय खेळी त्याला या यादीत तिसऱ्या स्थानावर घेऊन जाईल.