Sachin Tendulkar Marnus Labuschagne Tweet Controversy: भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने क्रिकेटला अलविदा केलं असलं तरी आजही त्याचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. सचिन सार्वजनिक जीवनात फारसा दिसत नसला तरी त्याच्या ट्वीट्सकडे चाहत्यांचे बारीक लक्ष असतं.
सचिन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बराच सक्रिय असतो. त्याने नुकतेच एक ट्वीट केले होते. ते ट्वीट एका खास कारणामुळे सध्या चर्चेत आले आहे.
सचिनने खरं तर एक ट्वीट केलं होतं. पण त्यावर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबूशेन याने जो रिप्लाय दिला, त्यामुळे सध्या या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे.
'कॉमनवेल्थ गेम्स मध्ये क्रिकेटला पुन्हा एकदा स्थान मिळाले याचा आनंद आहे. या निर्णयामुळे क्रिकेटला नवा दर्शकवर्ग मिळेल अशी आशा आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा', असे ट्वीट सचिन तेंडुलकरने केले.
सचिनच्या या ट्वीटवर लाबूशेन याने कमेंट केली, 'तुझं अगदी बरोबर आहे सचिन, ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत हा सलामीचा सामना नक्कीच मनोरंजक असेल.' लाबूशेनच्या या ट्वीटचा काही भारतीय चाहत्यांना राग आला. त्याचं कारण काय जाणून घेऊया.
सचिन तेंडुलकर याने भारतासाठी २४ वर्षे क्रिकेट खेळून समृद्ध कारकिर्द घडवली. तो लाबूशेन पेक्षा क्रिकेटमध्ये कित्येक पटीने मोठा आहे. त्यामुळे सचिनचा उल्लेख करताना सचिन सर किंवा तत्सम आदरार्थी शब्द लाबूशेनने वापरायला हवा होता, अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आणि त्यावरूनच लाबूशेनला काही कठोर शब्दही सुनावले.