टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. दोघांनीही टी२० क्रिकेट आणि कसोटी फॉरमॅटला निरोप दिला आहे. आता ही जोडी फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच मैदानावर दिसणार आहे.
चाहते या जोडीची आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित आणि विराट या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या टीम इंडियाचा भाग असू शकतात अशी चर्चा आहे. कोहली आणि रोहितचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो.
अशा परिस्थितीत, या दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीबाबतची चर्चादेखील खूपच तीव्र झाली आहे. पण याचदरम्यान, काही काळापूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी निरोपाबाबत दिलेले विधानही खूप व्हायरल होत आहे.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी, टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरला विचारण्यात आले की तुम्ही प्रशिक्षक आहात, तर कोहली आणि रोहितला तुमच्यासमोर चांगला निरोपाचा सामना मिळेल याची खात्री तुम्ही देऊ शकता का?
यावर गंभीर म्हणाला होता की कोणताही खेळाडू हा निवृत्तीसाठी किंवा निरोपाच्या सामन्यासाठी खेळत नसतो. आपण खेळाडूंचे योगदान लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांनी देशासाठी काय केले हे लक्षात ठेवले पाहिजे. देशाकडून मिळालेल्या प्रेमापेक्षा मोठा निरोप काय असू शकतो.
दरम्यान, आयसीसीने रोहित शर्माशी संबंधित एक पोस्टर जारी केले. हे पोस्टर २०२६ मध्ये इंग्लंडच्या भूमीवर भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या मालिकेबद्दल आहे. त्या पोस्टरवर रोहित शर्मा आणि हॅरी ब्रूकचा फोटो देखील आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयसीसीने काही काळानंतर कोणतेही कारण न देता हे पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काढून टाकले. मात्र, तोपर्यंत आयसीसीचे हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या घटनेमुळे आता विविध गोष्टींचे अर्थ लावले जात आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना यापुढे वनडेमध्ये कितपत संधी मिळेल याबाबत स्पष्टता दिली जात नसल्याने गौतम निवृत्तीबद्दलचे विधान सध्या व्हायरल झाले आहे.