आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेली पाकिस्तान सुपर लीगची स्पर्धा यंदा १७ फेब्रुवारीपासून खेळवली जात आहे. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे अनेक स्टार खेळाडूंनी या लीगकडे पाठ फिरवली आहे.
पाकिस्तान सुपर लीगचा यंदाचा हंगाम १७ तारखेपासून लाहोर येथून सुरू होईल. बांगलादेश प्रीमिअर लीग, ILT20 आणि SA20 लीगमध्ये परदेशी खेळाडू खेळत असल्याने सर्व सहा PSL फ्रँचायझींमध्ये नाराजी असल्याचे कळते.
परदेशी खेळाडूंनी पीएसएलकडे कानाडोळा केल्यामुळे फ्रँचायझींना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहा संघांचा समावेश आहे.
मुल्तान सुल्तान, कराची किंग्ज, क्वेटा ग्लॅडिएटर्स, पेशावर झाल्मी, लाहोर कलंदर्स आणि इस्लामाबाद युनायटेड हे संघ ट्रॉफीसाठी आमनेसामने आहेत.
मुल्तान सुल्तानच्या फ्रँचायझीला स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच मोठे झटके बसले. कारण करारबद्ध झालेल्या खेळाडूंनी आगामी हंगामातून माघार घेतली आहे, यामध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीचा समावेश आहे. तो दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
मुल्तानच्या संघाला वेगवान गोलंदाज एहसानुल्लाहची देखील कमी जाणवेल. बाबर आझमच्या पेशावर झल्मीने दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीला गमावले आहे. खेळाडूंनी माघार घेतली असली तर मायकेल क्लार्क, शेन वॉटसन यांसारखे नामांकित खेळाडू समालोचन आणि प्रशिक्षकाच्या माध्यमातून पीएसएलचा हिस्सा असतील.
क्वेटा ग्लॅडिएटर्सचा संघ श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाशिवाय मैदानात असेल. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू शाई होप, मॅथ्यू फोर्ड आणि अकिल हुसेन पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामात खेळणार नाहीत.
तसेच दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन, इंग्लंडचा जेम्स विन्स आणि अफगाणिस्तानचा नूर अहमद आणि नवीन-उल-हक यांनीही संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली आहे.
अनेक परदेशी खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे फ्रँचायझींची कोंडी झाली आहे. खेळाडूंनी माघार घेतल्याने संतप्त झालेल्या पीएसएल फ्रँचायझींच्या मालकांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला स्पर्धेच्या तारखांवर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. कारण एकाचवेळी जगभरात तीन लीग खेळवल्या जात आहेत.
अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० लीग पार पडली. ILT 20 ही लीग पाकिस्तान सुपर लीगला सुरूवात होईल त्या दिवशी संपेल. त्यामुळे काही परदेशी खेळाडू पीएसएलला मुकणार आहेत.