Prince Yadav: पोलीस भरतीसाठी उतरला; पण लेखी परीक्षा नाही दिली! कसा घडला २२ यार्डांवरचा ‘प्रिन्स’?

राजस्थान विरुद्ध दमदार कामगिरीसह पर्पल कॅपवर कब्जा

आयपीएल स्पर्धेत धमक दाखवून अनेक युवा क्रिकेट एका रात्रीत स्टार झाले आहेत. यंदाच्या हंगामात लखनौच्या ताफ्यातील प्रिन्स यादव पर्पल कॅपसह मिरवत लक्षवेधी ठरताना दिसतोय. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

प्रिन्स यादव हा मूळचा नजफगडचा. त्याचे वडील राम निवास यादव हे रेल्वे पोलिसांत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्यामुळे लेकानंही खाकी वर्दीत करिअर करावे, अशी त्यांची इच्छा होती.

वडिलांनी त्याला पोलीस शिपाई भरतीसाठी शारीरिक चाचणी देण्यास भाग पाडले. मात्र तो लेखी परीक्षेला बसलाच नाही, कारण त्याचं मन क्रिकेटच्या मैदानावरील २२ यार्डांवरच रमत होतं. तो सतत टेनिस क्रिकेट खेळताना दिसत असल्याने वडिलांना त्याच्या भविष्याची चिंता सतावत होती.

पण या पठ्ठ्यानं त्यांना स्पष्ट सांगितले, तुम्ही माझी चिंता करू नका. मी नक्की माझ्या जिद्दीच्या जोरावर काही तरी करुन दाखवेन. कमालीची गोष्ट ही की, वयाच्या १८ वर्षांपर्यंत लेदर बॉलचा गंधही नसणारा प्रिन्स यादव आज वयाच्या २४ व्या वर्षी IPL स्पर्धा गाजत आहे.

वय लपवण्यासंदर्भातील प्रकरणात बीसीसीआयकडून दोन वर्षांची कारवाई झालेल्या खेळाडूंच्या यादीत प्रिन्सचंही नाव होते. हा काळ त्याच्यासाठी कठीण आणि कणखर होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. घरात जिम, वाळूची पोती भरून ती खांद्यावर घेऊन शेतातून धावणे अशी कसरत करत त्याने फिटनेस कठोर मेहनत घेतली.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची क्षमता दाखवणारा प्रिन्स यादव २०२४ मध्ये दिल्ली प्रिमियर लीगमधील पुरानी दिल्ली ६ संघाकडून केलेल्या कामगिरीमुळे खरा चर्चेत आला. या स्पर्धेत १३ विकेट्स घेतल्यावर २०२५ च्या हंगामासाठी लखनौच्या संघाने त्याला ३० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात घेतलं. यंदाच्या हंगामात याच किंमतीत त्याला रिेटेन करण्यात आले आहे.

आता तो LSG च्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध २ विकेट्स घेत त्याने पर्पल कॅपवर कब्जा केला.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात LSG च्या संघाकडून ७ सामने खेळताना त्याने १३ विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात साखळी फेरीत अजून तो एवढेच सामने खेळणार आहे.