ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ आपल्या मायदेशात परतला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाचे नवी दिल्लीत विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.
भारतात परतताच टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने कुटुंबीयांची भेट घेतली. विराटची बहीण भावना कोहली डिंगाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
भारतीय संघाने बार्बाडोसच्या धरतीवर विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. गुरुवारी सकाळी टीम इंडिया राजधानी दिल्लीत पोहोचली.
आज संध्याकाळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येईल. इथे खेळाडूंच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडेल.
याशिवाय सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय यात्रा आणि वानखेडेवर महोत्सव साजरा केला जाणार आहे. विश्वचषक घरी येतोय, अशी पोस्ट मुंबईकर रोहितने एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
दरम्यान, आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने चाहत्यांना खुशखबर दिली. खरे तर वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना मोफत एन्ट्री मिळणार आहे. गेट नंबर २, ३ आणि ४ मधून दुपारी चार वाजल्यापासून चाहत्यांना वानखेडेमध्ये प्रवेश मिळेल.
टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. याआधी भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारतीय क्रिकेट संघाने ७, लोककल्याण मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
२९ जून रोजी बार्बाडोस येथे ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचली.