Bangladesh vs Pakistan, 2nd T20I : पाकिस्तान संघानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता त्यांचे लक्ष्य क्लिनस्वीपवर आहे. पण, आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानच्या दोन गोलंदाजांवर ICCनं कारवाईचा बडगा उचलला.
पहिल्या सामन्यात हसन अलीनं बांगलादेशचा फलंदाज बाद झाल्यानंतर अशोभनिय कृत्य केले आणि त्यामुळे आयसीसीनं त्याच्या मॅच फीमधील २० टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली.
त्यात दुसऱ्या सामन्यात शाहिन शाह आफ्रिदी ( Shaheen Afridi) यानं रागात बांगलादेशच्या फलंदाजाला चेंडू फेकून मारला. आफिफ होसैन ( Afif Hosain ) हा त्यानंतर वेदनेनं काहीकाळ जमिनीवरच झोपून राहिला होता. शाहिनच्या या कृतीची आयसीसीनं गंभीर दखल घेत पाकिस्तानी गोलंदाजावर कारवाई केली.
आफिफनं तिसऱ्या षटकात आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार खेचला, त्यामुळे चिडलेल्या आफ्रिदीनं आफिफला चेंडू फेकून मारला. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आफिफनं षटकार खेचला. चौथा चेंडू आफिफनं बचावात्मक खेळला अन् तो आफ्रिदीच्या हातात गेला. पाकिस्तानी गोलंदाजानं आफिफ क्रिजवर असूनही चेंडू जोरात फेकला अन् तो बांगलादेशच्या फलंदाजाच्या पायावर आदळला. त्यानंतर आफिफ वेदनेनं जमिनीवर झोपला. आफ्रिदीनं लगेच माफी मागितली, परंतु त्याची ही कृती लोकांना फार आवडली नाही. शादाब खाननं ९व्या षटकात आफिफला ( २०) बाद केले.
आयसीसीनं शाहिन आफ्रिदीला त्याच्या मॅच फीमधील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली आहे आणि त्याला १ डिमेरीट गुणही दिला आहे. शाहिनला पुढील २४ महिन्यांत चार किंवा त्यापेक्षा डिमेरीट गुण मिळाल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.