ICC World Test Championship 2023 Final - इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत यजमान पाकिस्तानवर २६ धावांनी विजय मिळवताना तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. आणखी एक लाजीरवाण्या पराभवामुळे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाद झाला.
पदार्पणवीर अब्रार अहमदने ( ११ विकेट्स) गोलंदाजीनंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानला आशेचा किरण दाखवला होता. पण, ४० वर्षीय जेम्स अँडरसनने त्याला बाद केले आणि इंग्लंडच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. मार्क वूड व ऑली रॉबिन्सन यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना पाकिस्तानचा डाव गुंडाळला.
अब्रारने पहिल्या डावात ७ विकेट्स घेताना इंग्लंडचा २८१ धावांवर गुंडाळला. पण, पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कर्णधार बाबर आजम ( ७५) व सौद शकिल ( ६३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने २०२ धावांपर्यंत कशीबशी मजल मारली. इंग्लंडने दुसऱ्या डावात बेन डकेट ( ७९) चे अर्धशतक व हॅरी ब्रूकच्या १०८ धावांच्या जोरावर २७५ धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्सने ४१ धावांचे योगदान दिले.
इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ३५५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात चांगली झाली. अब्दुल्लाह शफिक ( ४५) व मोहम्मद रिझवान ( ३०) यांनी चांगला खेळ केला, परंतु मार्क वूड व अँडरसनने त्यांचा अडथळा दूर केला. सौद शकिल ( ९४), इमाम-उल-हक ( ६०) व मोहम्मद नवाज ( ४५) यांनी संघर्ष सुरू ठेवला होता. पण, इंग्लंडने कमबॅक केले. सौद शकिलची विकेट वादाचा विषय ठरली.
अब्रार अहमदने मार्क वूडच्या एका षटकात तीन चौकार खेचून पाकिस्तानच्या चाहत्यांना खूश केले. पण, १७ धावांवर अँडरसनने त्याला झेल देण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा डाव ३२८ धावांत गुंडाळून इंग्लंडने दुसरी कसोटी जिंकली. २२ वर्षांनंतर इंग्लंडने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडने २६ धावांनी हा सामना जिंकला.
पाकिस्तान आता ICC WTC 2021-23 फायनलच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. आजच्या पराभवानंतर तो थेट सहाव्या क्रमांकावर गेला आहे. पाकिस्तानची ४२.४२ टक्केवारी आहे. ऑस्ट्रेलिया ७५ टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ( ६० टक्के), श्रीलंका ( ५३.३३ टक्के), भारत ( ५२.०८ टक्के) आणि इंग्लंड ( ४४.४४ टक्के) असा क्रम येतो.
ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित आहे. त्यांना उर्वरीत ७ पैकी ( ३ वि. दक्षिण आफ्रिका आणि ४ वि. भारत) दोन सामन्यांत विजय व एक ड्रॉ निर्णय फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेसा आहे. श्रीलंका, आफ्रिका आणि भारत हेही फायनलच्या शर्यतीत आहेत.
सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताला आणखी सहा सामने खेळायचे आहेत. बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामने होतील, त्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने खेळायला भारत दौऱ्यावर येईल. भारताला सहापैकी ५ सामने जिंकावे लागतील.
श्रीलंका दोन कसोटी सामने न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहेत आणि ते जिंकून ते अंतिम फेरीत पोहोचू शकतात, तर आफ्रिकेला उर्वरित पाच पैकी ( ३ वि. ऑस्ट्रेलिय व २ वि. वेस्ट इंडिज) ३ कसोटी जिंकाव्या लागणार आहेत. दोन फायनल स्पॉटसाठी आता चार संघ शर्यतीत आहेत.