बाबर आझमकडे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. शाहीन शाह आफ्रिदीला डच्चू देऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबरवर विश्वास दाखवला. बाबरला कर्णधारपद सोपवल्यानंतर पाकिस्तान दुसरीच मालिका खेळत आहे.
आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या शेजाऱ्यांना मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. मग रविवारी झालेला दुसरा सामना जिंकून पाकिस्तानने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
दुसऱ्या सामन्यातील विजयासह बाबर आझमने विश्वविक्रम केला. कर्णधार म्हणून सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा तो खेळाडू बनला आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने ४५ सामने जिंकले आहेत.
या यादीत दुसऱ्या स्थानावर ब्रायन मसाबा (४४) आहे, तर इयॉन मॉर्गन (४२), असघर अफघान (४२), महेंद्रसिंग धोनी (४१) आणि रोहित शर्मा (४१) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकानंतर बाबर आझमने पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मग ही जबाबदारी शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर सोपवण्यात आली. मात्र, केवळ एका मालिकेनंतर आफ्रिदीची हकालपट्टी करण्यात आली.
आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला असता तिथे शेजाऱ्यांना ४-१ ने पराभव पत्करावा लागला होता. अलीकडेच न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता, यावेळी किवी संघाने बाबरच्या नेतृत्वातील संघाला कडवी झुंज देताना मालिका बरोबरीत संपवली.