पाकिस्तान संघातील 'कलह' चव्हाट्यावर आणणारा सापडला, होणार वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी

पाकिस्तान क्रिकेट संघ कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच आशिया चषक स्पर्धेत त्यांना अपयश आले आणि त्यामु आश्चर्याचा धक्का बसला.

आशिया चषकाचा प्रबळ दावेदार समजला जाणाऱ्या पाकिस्तानला फायनलही गाठता आली नाही. त्यांना भारताकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेनेही सुपर ४च्या लढतीत रोमहर्षक विजय मिळवून पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला

आशिया चषकाच्या आयोजनापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चर्चेत होतेच. BCCIने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आणि पीसीबी टीम इंडियाने खेळायला यावे यावर ठाम होते. शेवटी स्पर्धेचे यजमानपद श्रीलंका-पाकिस्तान यांना वाटून द्यावे लागले.

पाकिस्तान संघाने आशिया चषकाची सुरुवात दमदारपणे केली होती. पण, सुपर ४ मध्ये भारताविरुद्ध त्यांना हार पत्करावी लागली. बाबर आजम ज्या गोलंदाजीवर जोरावर उडत होता, त्यांना विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी चोपून काढले. त्यांच्या शतकांच्या जोरावर भारताने ३५६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान १२८ धावांत गडगडला.

भारताच्या पराभवानंतर श्रीलंकेविरुद्धच्या करो व मरो सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी फ्लॉप झाली आणि अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. या पराभवासह पाकिस्तान आशिया चषकातून बाहेर झाला. सामन्यानंतर संघाचा कर्णधार बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात वाद झाल्याचे वृत्त समोर आले.

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूमची बातमी बाहेर आली आणि सर्वांनाच आश्चर्य वाटले. बाबर आजम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये वादाच्या चर्चेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. प्रसारमाध्यमांमध्ये ही बाब समोर आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.

ड्रेसिंग रुमचा कहल बाहेर आणणाऱ्या खेळाडूचे नाव आता समोर आले आहे. संघाचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांचा पुतण्या इमाम उल हकने हे काम केल्याची चर्चा आहे. पाकिस्तानचा सलामीवीर इमामने ड्रेसिंग रूममधील चर्चा लीक केल्याचे वृत्त आहे. याची चौकशी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला इमाम उल हकने ड्रेसिंग रुमचे प्रकरण सार्वजनिक केल्याचा पुरावा सापडला तर त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. त्याला कदाचित वर्ल्ड कप संघातूनही वगळले जाऊ शकते.

पुढील महिन्यात भारतात आयसीसी वन डे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तपासात इमाम उल हकचे नाव पुढे आले तर त्याला वर्ल्ड कप खेळणे कठीण होऊ शकते. शिस्त मोडल्याबद्दल आणि टीम मीटिंगचे रहस्य उघड केल्याबद्दल त्याला संघाबाहेर ठेवले जाऊ शकते.