"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले

Salman Ali Agha on IND vs PAK Asia Cup Final : बांगलादेशला हरवून पाकिस्तान अंतिम फेरीत, रविवारी भारताशी भिडणार

आशिया चषक स्पर्धेत रविवारी अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पुन्हा एकदा सामना पाकिस्तान क्रिकेट संघाशी होणार आहे. बांगलादेशला हरवून पाकिस्तानने गुरूवारी अंतिम फेरीचे तिकीट मिळवले.

पाकिस्तानची फलंदाजी फारशी चांगली झाली नव्हती. मोहम्मह हॅरिसच्या ३१ धावांमुळे पाकिस्तानने १३५ धावा केल्या. त्यानंतर शाहीन आफ्रिदीने १७ धावांत ३ तर हॅरिस रौफने ३३ धावांत ३ बळी घेत पाकला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा म्हणाला, "जर आम्ही अशा पद्धतीचे सामने जिंकू शकतो, तर आमचा संघ नक्कीच खास आहे. आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूपच उत्तम झाले. सर्वांनी विजयासाठी १०० टक्के प्रयत्न केले."

"शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ या जोडीने सुरुवातीला ज्याप्रकारे भेदक गोलंदाजी केली ते खूपच विशेष होते. आम्ही जिंकण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहोत. संघाला सुधारणेसाठी वाव आणि आम्ही अंतिम सामन्यात नक्कीच आमच्या खेळात सुधारणा करू."

"मोहम्मद हॅरीस खूपच स्पेशल खेळाडू आहे. तो त्याच्या नैसर्गिक क्रमांकावर फलंदाजी करत नाहीये. पण तरीही तो संघाला गरज असेल तेव्हा चांगली कामगिरी करत आहे. तो सगळ्या सामन्यांत चांगली कामगिरी करतोय. आमचा स्कोअर १०-१५ धावा कमी झाला होता."

"पण आमच्या गोलंदाजांनी आम्हाला विजय मिळवून दिला. नव्या चेंडूने जेव्हा तुमचे गोलंदाज अशी गोलंदाजी करतात, तेव्हा तुमची जिंकण्याची शक्यता वाढते. आमचे सर्वच खेळाडू सध्या प्रचंड मेहनत घेत आहेत."

"भारताविरूद्ध फायनलमध्ये खेळण्यासाठी आम्ही उत्साही आहोत. आम्हाला माहितीये की आम्ही काय केले पाहिजे. आमचा संघ इतका चांगला आहे की, आम्ही कुणालाही हरवू शकतो. फायनलमध्ये आम्ही त्यांना हरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू."