२०२५ मध्ये भारतीय संघाची टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कामगिरी प्रभावी होती. भारताने या वर्षी २१ टी२० सामने खेळून त्यापैकी १६ जिंकले. भारतीय संघाने तीन सामने गमावले आणि दोन सामने अनिर्णित राहिले.
या वर्षी भारताने घरच्या मैदानावर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियन भूमीवर टी२० मालिका जिंकली. याशिवाय, टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून २०२५चा आशिया कपही जिंकला.
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माने यावर्षात २१ टी२०मध्ये ४३च्या सरासरीने ८९५ धावा केल्या. त्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तरीही अभिषेक सर्वाधिक धावांच्या यादीत सातवा आहे.
ऑस्ट्रिया संघाचा करणबीर सिंग यावर्षी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. करणबीरने ३२ टी२०मध्ये १,४८८ धावा केल्या असून त्याच्या नावे दोन शतके आणि १३ अर्धशतके आहेत.
संपूर्ण वर्षभराच्या काळात करणबीर सिंगची सरासरी ५१.३१ होती आणि त्याचा स्ट्राइक रेट १७४.८५ होता. करणबीर दमदार फलंदाजीमुळे २०२५मधील सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज बनला.
करणबीरने सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानलाही मागे टाकले. रिझवानने २०२१ मध्ये २९ सामन्यात १,३२६ धावा केल्या होत्या. तर सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये १,१६४ धावा केल्या होत्या.
करबीर सिंगने यावर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२२ षटकार मारले आहेत. एका कॅलेंडर वर्षात एखाद्या फलंदाजाने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे.