टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या लढतीत भारतीय संघाने नामिबियावर ९३ धावांनी आरामात विजय मिळवला. मात्र या विजयानंतरही भारतीय संघव्यवस्थापनाची चिंता वाढलेली आहे. दुबळ्या नामिबियाविरुद्ध खेळताना भारतीय संघाच्या खेळामधील अनेक उणिवा उघड झाल्या असून, सामन्यात भारती संघाकडून बऱ्याच चुकाही झाल्या आहेत. त्यामुळे रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी भारतीय संघव्यवस्थापनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत काल नामिबियाविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघाने सहज विजय मिळवला असला तरी या सामन्यामधून भारतीय संघामधील अनेक उणिवा प्रकर्षाने समोर आल्या आहेत. अमेरिकेविरुद्धच्या लढतीप्रमाणेच या सामन्यामध्येही भारतीय संघातील अनेक फलंदाजांनी निराशा केली. विशेषकरून अक्षर पटेल आणि रिंकू सिंह पुन्हा एकदा अपयशी ठरले. ही बाब पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणाऱ्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी चिंता वाढवणारी आहे.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात ईशान किशनने २४ चेंडूत ६१ धावांची खेळी केली तर हार्दिक पांड्या याने २८ चेंडूत ५२ धावा ठोकून काढत भारतीय संघाला २०९ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. मात्र भारतीय संघाने सुरुवातीला ज्या वेगाने धावा कुटल्या होत्या, त्या पाहता भारती संघ मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. मात्र अखेरीस भारतीय संघाला केवळ २०९ धावांपर्यंतच मजल मारता आली. अखेरच्या षटकांमधील ही कामगिरी भारताच्या संघव्यवस्थापनाची चिंता वाढवणारी आहे.
काल झालेल्या सामन्यात नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस याने ४ बळी टिपत भारतीय संघाच्या डावाला अंकुश लावला. त्याच्या साईड- आर्म आणि क्रिझमागून होणाऱ्या गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज चाचपडले. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीत पाकिस्तानचा गोलंदाज उस्मान तारिक याचा सामना करताना भारताच्या फलंजाजांचा कस लागणार आहे.
आता सुपर ८ मध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला पुढील दोन सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. मात्र नामिबियाविरुद्धचा सामना सहज जिंकला असला तरी मधल्या षटकांमध्ये अडखळलेली फलंदाजी आणि दुबळ्या संघांविरुद्ध झालेल्या पहिल्या दोन सामन्यात प्रमुख फलंदाजांनी केलेली निराशा यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोरील चिंता वाढलेली आहे.
मात्र हार्दिक पांड्याने केलेली अष्टपैलू कामगिरी आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने केलेली भेदक गोलंदाजी हे पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय संघासाठी सकारात्मक संकेत असल्याचे मानले जात आहे.