आशिया कप स्पर्धेतील छोट्या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये दोन भारतीयांचा बोलबाला आहे. पण यंदाच्या हंगामात ते टीम इंडियाचा भाग नसतील.
इथं एक नजर टाकुयात आशिया कप स्पर्धेतील टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्वर...
क्रिकेट जगतात रनमशिन या नावाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या विराट कोहलीनं २०१६ ते २०२२ या कालावधीत सर्वाधिक १० सामने खेळताना ९ डावात आशिया कप स्पर्धेत (टी-२०) ४२९ धावा काढल्या आहेत. यात त्याने एका शतकासह ३ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद १२२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कोहलीनं टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये.
पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान याने २०२२ च्या हंगामातील ६ सामन्यातील ६ डावात ३ अर्धशतकासह २८१ धावा केल्या होत्या. तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
भारताची माजी कर्णधार रोहित शर्मा आने २०१६ ते २०२२ या कालावधीत आशिया कप स्पर्धेत ९ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने २ अर्धशतकाच्या मदतीने २७१ धावा केल्या आहेत. रोहित शर्माही २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालाय.
हाँगकाँगच्या ताफ्यातील बाबर हयाद या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. २०१६ ते २०११ या कालावधीत आशिया कप स्पर्धेतील ५ टी-२० सामन्यात त्याने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने २२५ धावा ठोकल्या आहेत.
अफगाणिस्तानचा इब्राहिम झदरान याने २०२२ च्या हंगामातील आशिया कप स्पर्धेत ५ टी-२० सामन्यात एका अर्धशतकाच्या मदतीने १९६ धावा केल्या आहेत.