IND vs NZ T20 Series: भारताविरुद्ध मालिकेत कुठे झाली चूक; न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनं स्पष्टच सांगितलं

IND vs NZ T20 Series: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी सहज खिशात घातली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी सहज खिशात घातली. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात फलंदाजांच्या उल्लेखनीय योगदानानंतर गोलंदाजांनीही चोख भूमिका बजावली.

कर्णधार रोहितनं ( Rohit Sharma) पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलच्या ( Axar Patel) हाती चेंडू देऊन सामना सुरुवातीलाच किवींकडून हिसकावून घेतला. अक्षरनं पॉवर प्लेमध्ये २ धावांत ३ विकेट्स घेत पाहुण्यांना बॅकफूटवर टाकले आणि त्यानंतर अन्य गोलंदाज टप्प्याटप्प्यानं विकेट्स घेत राहिले. भारतानं हा सामना ७३ धावांनी जिंकला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला

केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान झालेल्या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम सऊदीनं संघाचं नेतृत्व केलं. तर अखेरच्या मॅचमध्ये कर्णधारपदाची धुरा ही मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आली होती.

टीम सौदी हा मालिकेतील तिसरा सामना खेळला नाही. दरम्यान भारताविरोधात ७३ धावांच्या फरकानं झालेल्या मोठ्या पराभवानंतर मिचेल सँटनरनं मालिकेदरम्यान कोणती चूक झाली हे स्पष्टच सांगितलं. टीममध्ये विल्यमसनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली असल्याचं त्यानं सांगितलं. तसंच २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर त्यानं टी २० सामन्यांमधून माघार घेतली होती.

"भारताची मालिकेत कामगिरी ही उत्तम होती. त्यांनी गोलंदाजीही उत्तम केली त्यामुळे याचं क्रेडिट हे त्यांचाच जातं. आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. आमचा सामना भारताच्या अतिशय चांगल्या टीमशी होता. भारताला त्यांच्याच पिचवर हरवणं कठीण आहे आणि या मालिकेत ते दिसून आलं," असं सँटनर म्हणाला.

"केन विल्यमसन हा एक उत्तम फलंदाज आहे. त्याची संघातील कमतरता आम्हाला जाणवली. आता कसोटी मालिका आहेत आणि अन्य खेळाडूंना त्यात संधी मिळेल. परंतु भारताचा पराभव करणं कठीण आहे," असंही त्यानं सांगितलं.

अखेरच्या सामन्यात अक्षर पटेलनंही उत्तम गोलंदाजी केली, तसंच त्याला मॅन ऑफ द मॅचही देण्यात आलं. "मी फलंदाजांच्या डोक्यात काय सुरू आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. या पिचची मदत होत होती आणि मी बॉल टर्नही करण्याचे प्रयत्न केले. या वर्षाच्या सुरूवातीला माझं कसोटी सामन्यातील पदार्पण उत्तम होतं आणि आयपीएलही उत्तम गेलं. आता माझी नजर कसोटी सामन्यावर आहे," असं अक्षर पटेल म्हणाला.

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियानं आठव्यांदा टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेवर कब्जा केला आहे. टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक धावांनी पराभव झालेली ही चौथी वेळ आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा २०१० मध्ये पाकिस्ताननं १०३, २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ७८ आणि २०१९ मध्ये इंग्लंडनं ७८ धावांनी पराभव केला होता.

भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर रोहित शर्मा व राहुल द्रविड या नव्या जोडीच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच मालिकेत ३-०असा विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघानं प्रमुख खेळाडूंना विश्रांती देताना नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली.

कर्णधार रोहितनं या युवा खेळाडूंना दडपणाशिवाय खेळण्याचा सल्ला दिला आणि त्याचा फायदा संघाला झाला. राहुल द्रविडनं या मालिकेपासून आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे संघातील उणीवा दूर करण्यावर त्यानं भर दिलेला पाहायला मिळाला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी सहज खिशात घातली. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात फलंदाजांच्या उल्लेखनीय योगदानानंतर गोलंदाजांनीही चोख भूमिका बजावली.

कर्णधार रोहितनं (Rohit Sharma) पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलच्या ( Axar Patel) हाती चेंडू देऊन सामना सुरुवातीलाच किवींकडून हिसकावून घेतला. अक्षरनं पॉवर प्लेमध्ये २ धावांत ३ विकेट्स घेत पाहुण्यांना बॅकफूटवर टाकले आणि त्यानंतर अन्य गोलंदाज टप्प्याटप्प्यानं विकेट्स घेत राहिले. भारतानं हा सामना ७३ धावांनी जिंकला, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला.