ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन कसोटी क्रिकेटमधील नंबर एक फलंदाज बनला आहे. त्याने आयसीसीच्या प्रसिद्ध झालेल्या ताजा यादीमध्ये लाबुशेन इंग्लंडचा कर्णधार जो रूटला मागे टाकून अव्वलस्थानी पोहोचला आहे. लाबुशेनच्या खात्यात ९१२ गुण आहेत. तर जो रूट याच्या खात्यात ८९७ गुण आहेत. कसोटी क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहोचलेल्या लाबुशेनने केवळ ३ वर्षे आणि २० कसोटी सामन्यांमध्येच हा कारमाना करून दाखवला आहे.
मार्नस लाबुशेनने आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये २० कसोटी सामन्यांमध्ये ६ शतके आणि १२ अर्धशतके फटकावली आहेत. कसोटीमधील फलंदाजांच्या सरासरीचा विचार केल्यास लाबुशेन केवळ डॉन ब्रॅडमन यांच्या मागे आहे.
लाबुशेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला अनुभव २०१४ मध्ये घेतला होता. तेव्हा भारताविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीमध्ये तो बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. तेव्हा त्याने एक अप्रतिम झेल टिपला होता. दरम्यान, २०१८ मध्ये लाबुशेनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा पहिल्या डावात तो शुन्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ १३ धावाच करता आल्या होत्या.
त्यानंतर २०१८ मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीमध्येही तो खेळला. त्यात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत ३८ धावा बनवल्या. तर मालिकेतील पुढच्या दोन सामन्यात ८१ धावा जमवल्या. तर २०१९ च्या अॅशेस मालिकेत स्मिथ जखमी झाल्याने मिळालेल्या संधीचा फायदा उठवत ५९ धावांची खेळी केली होती.
त्या मालिकेत लाबुशेनने ५०.४२ च्या सरासरीने धावा जमवताना चार अर्धशतके ठोकली. त्यामुळे क्रमवारीत तो ३५ व्या क्रमांकावर पोहोचला. त्यानंतर मात्र लाबुशेनने मागे वळून पाहिले नाही. त्याने २०१९-२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८५ आणि १६२ धावांच्या खेळी केल्या. तर न्यूझीलंडविरुद्धही १४३ धावांची खेळी केली. तर दोन अर्धशतके फटकावली. या हंगामात त्याने ११२ च्या सरासरीने त्याने एकूण ८९६ धावा चोपल्या. तसेच तो क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
गेल्यावर्षी भारतीय संघाने जेव्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा केवळ मार्नस लाबुशेह हाच भारतीय गोलंदाजांसमोर टिकून खेळला. त्याने सिडनी कसोटीत ९१ आणि ७३ धावांच्या खेळी केल्या. तर ब्रिस्बेनमध्ये शतक ठोकले. तर आता इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिकेमध्येही त्याने जबरदस्त खेळ केला आहे. पहिल्या कसोटी ७४ धावांची खेळी केल्यानंतर त्याने दुसऱ्या कसोटीत शतक आणि अर्धशतक फटकावले त्याबरोबरच तो कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला.