भारताच्या यंग ब्रिगेडनं नुकत्याच पार पाडलेल्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात मात्र त्यांना बांगलादेशकडून हार मानावी लागली. ही स्पर्धा गाजवल्यानंतर आता यंग ब्रिगेडमधील काही शिलेदार इंडियन प्रीमिअर लीग 2020 मध्ये कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहेत.
यशस्वी जैस्वाल - वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक धावा करण्याचा मान यशस्वीनं पटकावला. त्यानं सहा सामन्यात 400 धावा केल्या. आयपीएल 2020 लिलावात सर्वाधिक रक्कम मिळालेल्या युवा खेळाडूंमध्येही यशस्वी अव्वल स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स संघानं त्याच्यासाठी 2.4 कोटी रुपये मोजले. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांच्या नजरा यशस्वीवरच असणार आहेत. जोस बटलरच्या अनुपस्थितीत यशस्वीला काही सामने खेळण्याची संधी मिळू शकते.
प्रियम गर्ग - भारतीय संघाच्या कर्णधार प्रियमच्या नावावर 12 प्रथम श्रेणी, 19 लिस्ट ए आणि 11 ट्वेंटी-20 सामने आहेत. त्याला सनरायझर्स हैदराबाद संघानं 1.9 कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. यशस्वीप्रमाणे प्रियमलाही मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
रवी बिश्नोई - राजस्थानच्या या फिरकीपटूनं युवा वर्ल्ड कप गाजवला. किंग्स इलेव्हन पंजाबनं त्याच्यासाठी 2 कोटी रुपये मोजले आहेत. पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनील कुंबळे त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी देऊ शकतात.
कार्तिक त्यागी - 2017मध्ये राज्याच्या वरिष्ठ संघात पदार्पण करून या खेळाडूनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. युवा वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केले. राजस्थान रॉयल्सनं त्याच्यासाठी 1.3 कोटी रुपये मोजलेत.
आकाश सिंग - वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने सहा सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थान रॉयल्सनं त्याला 20 लाखाच्या मुळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले.