क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात गोलंदाजांसाठी पाच विकेट्सची कामगिरी अन् फलंदाजासाठी शतकी कामगिरी हा अविस्मरणीय क्षण असतो. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं पहिल्यांदा पाच विकेट्सचा डाव साधला. आता शतकी खेळीसह फलंदाजीत कोण छाप सोडणार ते पाहण्याजोगे असेल.
इंग्लंड दौऱ्यावरील सध्याच्या भारतीय संघात फक्त एकमेव असा खेळाडू आहे ज्याने लॉर्ड्सच्या मैदानात शतक झळकावले आहे. ते नाव म्हणजे लोकेश राहुल.
इथं एक नजर टाकुात लोकेश राहुलसह लॉर्ड्सच्या मैदानात शतक झळकवणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर...
लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय कसोटी संघातून खेळताना सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम हा दिलीप वेंगसरकर यांच्या नावे आहे. या दिग्गज फलंदाजाने क्रिकेटच्या पंढरीत ३ शतके झळकावली आहेत. १९७९ च्या दौऱ्यात १०३ धावांची नाबाद खेळीसह १९८२ च्या दौऱ्यातील १५७ धावांची खेळी अन् १९८६ च्या दौऱ्यात त्यांच्या भात्यातून १२६ धावा आल्याचे पाहायला मिळाले होते.
१९५२ मध्ये विनू मंकड यांनी लॉर्ड्सच्या मैदानात १८४ धावांची खेळी केली होती.
१९९६ च्या दौऱ्यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने लॉर्ड्सच्या मैदानात १३१ धावांची खेळी केली होती.
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात राहुल द्रविडनंही शतकी खेळी केली आहे. २०११ च्या दौऱ्यात त्याने या मैदानात १०३ धावांची नाबाद खेळी साकारली होती.
लोकेश राहुलनं २०२१ च्या दौऱ्यात ऐतिहासिक मैदानात १२९ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.
भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी गोलंदाज अजित आगरकर यांच्या नावेही या मैदानात एका शतकाची नोंद आहे. २००२ च्या इंग्लंड दौऱ्यात अजित आगरक यांनी आठव्या क्रमांकावर १०९ धावांची नाबाद खेळी साकारली होती. हे त्यांचा आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील एकमेव शतक आहे.