दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून आयर्लंडनं इतिहास घडवला; World Cup Super League points table टीम इंडियाला फटका बसला!

ICC Cricket World Cup Super League points table आयर्लंडनं या विजयासह ICC Cricket World Cup Super Leagueच्या गुणतालिकेत मोठी भरारी घेतली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंगळवारी दोन धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाल इभ्रत वाचवण्यासाठीच्या तिसऱ्या वन डे सामन्यात मोठा पल्ला उभा करूनही पराभव पत्करावा लागला, तर दुसरीकडे आयर्लंडनं दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला.

आयर्लंडनं पहिल्यांदाच वन डे सामन्यात आफ्रिकेवर विजय मिळवला. २९१ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव २४७ धावांत गुंडाळून आयर्लंडनं ४३ धावांनी विजय मिळवला. आयर्लंडनं या विजयासह ICC Cricket World Cup Super Leagueच्या गुणतालिकेत मोठी भरारी घेतली.

इंग्लंड-पाकिस्तान तिसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) विक्रमी खेळी करून पाकिस्तानला ३३१ धावांचा डोंगर उभा करून दिला. पण, इंग्लंडच्या B संघातील युवा खेळाडूंनी तिसरा वन डे सामना जिंकून मालिका ३-० अशी खिशात घातली.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा निम्मा संघ १६५ धावांत माघारी परतला होता, तरीही पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही. जेम्स व्हिंस आणि लुईस ग्रेगरी या युवा खेळाडूंनी पाकिस्तानच्या अनुभवी गोलंदाजांची धुलाई केली. व्हिंसनं ९५ चेंडूंत ११ चौकारांसह १०२ धावा केल्या. ग्रेगरीनं ६९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावा केल्या.

दुसरीकडे आयर्लंडनं अँडी बालबर्नी याच्या शतकाच्या जोरावर मोठा डोंगर उभा केला. बारबर्नीनं ११७ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह १०२ धावा केल्या. हॅरी टेक्टरनं ६८ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह ७९ धावा केल्या. जॉर्ज डॉक्रेलनं ४५ आणि अँडी मॅकब्रीननं ३० धावा केल्या. आयर्लंडनं ५ बाद २९० धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला २४७ धावाच करता आल्या. जॅनेमॅन मलान ( ८४) आणि रॅसी व्हॅन डी ड्युसेन ( ४९) यांच्या व्यतिरिक्त अन्य फलंदाजांना अपयश आलं. मार्क एडर, जोश लिटल आणि अँडी मॅकब्रीन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

या विजयानंतर आयर्लंडनं ICC Cricket World Cup Super League points tableमध्ये ३५ गुणांसह थेट पाचव्या स्थानी झेप घेतली. त्यांनी भारताला ९व्य स्थानी ढकलले. इंग्लंड ९५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. या गुणतालिकेतील अव्वल ८ संघ २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत.

ही स्पर्धा भारतात होणार असल्यामुळे टीम इंडिया आधीच पात्र ठरली आहे.