Join us

वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 09:07 IST

Open in App
1 / 7

रविवारी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातली.

2 / 7

स्पर्धेतील मोक्याच्या क्षणी उंचावलेल्या कामगिरीत सातत्य राखत भारतीय महिला संघाने अंतिम लढतीत इतिहास घडवला. दरम्यान, अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली ती युवा क्रिकेटपटू शेफाली वर्मा हिने.

3 / 7

खरंतर शेफाली वर्मा ही या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय महिला संघाचा भाग नव्हती. मात्र स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात सलामीवीर प्रतिका रावल हिला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याने तिला संघाबाहेर जावं लागलं आणि ऐनवेळी शेफाली वर्माचा संघात समावेश करण्यात आला.

4 / 7

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागप्रमाणे फलंदाजीची आक्रमक शैली असल्याने लेडी सेहवाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात संघात स्थान देण्यात आले. मात्र आक्रमक सुरुवातीनंतर ती १० धावा काढून बाद झाली. त्यामुळे अंतिम लढतीपूर्वी तिच्यावर दबाव होता.

5 / 7

दरम्यान, रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात शेफालीने संधी सोडली नाही. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत तिने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना दबावाखाली आणले. यादरम्यान, मिळालेल्या एका जीवदानाचा फायदा घेत तिने ७८ चेंडूत ८७ धावांची दमकार खेळी केली. शेफालीचं शतक थोडक्यात हुकलं, मात्र तिनं स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिक्ससह उपयुक्त भागीदाऱ्या करत संघाच्या डावाला भक्कम पायाभरणी करून दिली.

6 / 7

शेफालीने फलंदाजीतच कमाल दाखवली असं नाही तर गोलंदाजीमध्येही आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत तिने निर्णायक क्षणी दोन महत्त्वाचे बळी टिपत सामन्याचं पारडं भारतीय संघाच्या बाजूने झुकवलं.

7 / 7

या अष्टपैलू कामगिरीसाठी शेफालीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संघातही नसलेली शेफाली वर्मा संधीचं सोनं करत खऱ्या अर्थाने मॅचविनर ठरली.

टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका