Join us

INDW vs BANW: १८ वर्षीय शेफाली वर्माने अर्धशतक ठोकून रचला इतिहास; अनोख्या विक्रमाला घातली गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 17:06 IST

Open in App
1 / 6

भारतीय महिला संघाने बांगलादेशला चितपट करून स्पर्धेतील चौथा विजय मिळवला आहे. भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा हिने अष्टपैलू खेळी करून सर्वांची मने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने शानदार फलंदाजी करून यजमान संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला. शेफाली वर्मा हिने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शानदार अर्धशतक झळकावले. तिने ४४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली.

2 / 6

शेफालीने तिच्या अर्धशतकी खेळीदरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिच्या वैयक्तिक १,००० धावा पूर्ण केल्या. या फॉरमॅटमध्ये १,००० धावा करणारी ती सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. शेफालीने वयाच्या १८व्या वर्षी २५३ दिवसांत हा पराक्रम केला आहे. शेफालीने भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सला मागे टाकले आहे. रॉड्रिग्सने वयाच्या २१व्या वर्षी १११ दिवसांत १,००० टी-२० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या.

3 / 6

लक्षणीय बाब म्हणजे मार्च २०२१ नंतर या फॉरमॅटमधले शेफालीचे हे पहिले अर्धशतक आहे. शेफाली आणि कर्णधार स्मृती मानधनाच्या जोडीने आजच्या सामन्यात पहिल्या बळीसाठी १२ षटकांत ९६ धावा जोडल्या. महिला टी-२० मध्ये भारतासाठी १०वेळा पन्नासहून अधिक भागीदारी नोंदवणारी ही पहिली जोडी ठरली आहे.

4 / 6

मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५९ धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाला अपयश आले. शेफाली वर्मा आणि कर्णधार मानधनाने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने स्पर्धेत विजयी चौकार लगावला आहे. पाकिस्तानविरूद्ध झालेल्या पराभवानंतर कमबॅक करत भारतीय संघाने बांगलादेशविरूद्ध ५९ धावांनी मोठा विजय मिळवला.

5 / 6

खरं तर शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताला पाकिस्तानने पराभूत केले होते. मात्र आज मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे भारताने उपांत्यफेरीकडे कूच केली आहे. आजच्या सामन्यात संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आली होती. आज भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून शेफाली वर्मा हिने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली तर स्मृती मानधना (४७) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (३५) धावा करून बाद झाली.

6 / 6

भारताने बांगलादेशसमोर १६० धावांचे तगडे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाला अपयश आले. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. फरगाना हक्क आणि निगार सुलताना याव्यतिरिक्त कोणत्याच फलंदाला साजेशी खेळी करता आली नाही. अखेर २० षटकांत बांगलादेशचा संघ ७ बाद केवळ १०० धावा करू शकला. भारताकडून शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २-२ बळी पटकावले. तर रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशएशिया कप 2022स्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघबांगलादेश
Open in App