Join us

४० पैकी ३५ निर्णय अचूक, ३ महिन्यात फक्त २ दिवस राहिलेत घरी; भारतीय पंच नितीन मेनन यांची जोरदार हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 19:03 IST

Open in App
1 / 10

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात सध्या भारतीय पंच नितीन मेनन यांचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे. त्यांनी दिलेल्या अचूक निर्णयांबाबत सामना सुरू असताना समालोचकांनीही वेळोवेळी कौतुक केलं आहे.

2 / 10

३७ वर्षीय नितीन मेनन यांचा जून २०२० साली आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनलमध्ये समावेश केला गेला. पण त्यांना मैदानावर उतरण्याची संधी यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात मिळाली.

3 / 10

कोविड-१९ महामारीमुळे आयसीसीवर स्थानिक पंचांनाच सामन्यात नियुक्त करण्याची नामुष्की ओढावली. नितीन मेनन यांनी भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत प्रचंड दबावातही चांगले निर्णय घेतले. उलट दबावाच्या क्षणी माझ्याकडून चांगली कामगिरी होते, असं मेनन मिश्किलपणे सांगतात.

4 / 10

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत नितीन मेनन पंच म्हणून कामगिरी पाहत असताना एकूण ४० वेळा तिसऱ्या पंचांची मदत मागण्यात आली. यातील नितीन मेनन यांनी दिलेले ३५ निर्णय अचूक ठरले, तर फक्त पाच निर्णय तिसऱ्या पंचांना बदलावे लागले.

5 / 10

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिनही मालिकांमध्ये नितीन मेनन पंच होते. सलग दोन महिने पंच म्हणून कामगिरी बजावल्यानंतर त्यांना आपल्या राहत्या घरी केवळ दोन दिवस राहता आलं आहे. आता ते आयपीएलमध्येही पंच राहणार आहेत. यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'बायो-बबल'मध्ये दाखल झाले आहेत.

6 / 10

'जागतिक क्रिकेटमधील दोन अव्वल क्रमांच्या संघांमधल्या मालिकेत पंच म्हणून कामगिरी पाहायची आहे. याचा अतिशय काळजीपूर्वक विचार करुन मी तयारी केली आणि चांगली कामगिरी झाल्यानं मी खूप खूश आहे', असं नितीन मेनन म्हणाले.

7 / 10

'भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यानं पंच म्हणून काम पाहिलेलं असल्यानं माझ्यासाठी सलग दोन महिने काम करणं काही नवं नव्हतं. रणजीमध्ये आम्ही सरासरी ८ सामन्यांमध्ये पंच म्हणून कामगिरी पार पाडतो. यात प्रवासही करावा लागतो. मला वाटतं पंचाची भूमिका पार पाडण्यासाठी तुम्ही मानसिकरित्या किती भक्कम आहेत यावर अवलंबून असते', असंही नितीन मेनन म्हणातात.

8 / 10

जेव्हा तुमच्या चांगल्या कामाची दखल घेऊन तुमचं कौतुक केलं जातं हे देखील मला खूप आनंद देणारं आहे, असं म्हणत नितीन मेनन यांनी आभार देखील व्यक्त केले.

9 / 10

एस. व्यंकटराघवन आणि एस.रवी यांच्यानंतर आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये समावेश होणारे नितीन मेनन हे तिसरे भारतीय पंच आहेत.

10 / 10

आयपीएलच्या बायो बबलच्या नियमांचं पालन करणं आणि सलग दोन महिने अज्ञातवासात राहण्यासारखं हे अतिशय कठीण काम असल्याचंही ते म्हणाले. ज्या दिवशी सामना असतो तेव्हा काही वाटत नाही कारण आम्ही आमचं काम करत असतो. पण ज्या दिवशी तुम्ही हॉटेलच्या एका रुममध्ये दिवसभर बंदिस्थ असता तेव्हा वेळ घालवणं खूप आव्हानात्मक असतं, असं नितीन मेनन यांनी सांगितलं.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआयसीसीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयपीएल