भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर फेब्रुवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. शार्दुल त्याची मैत्रीण मिताली परुलकरसोबत सात फेरे घेणार आहे. मिताली परुलकर ही एक व्यावसायिक महिला आहे.
शार्दुलची होणारी बायको मिताली परुलकर हिने लग्नाची तारीख जाहीर केली आहे. मितालीने हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना म्हटले, 'मी आणि शार्दुल 27 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न करणार आहेत.'
मितालीने सांगितले की, आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणाऱ्या शार्दुलचे वेळापत्रक सध्या खूप व्यस्त आहे आणि तो 24 फेब्रुवारीपर्यंत क्रिकेट खेळणार आहे. यानंतर 25 फेब्रुवारीपासून या सोहळ्यासाठी उपस्थित असेल.
लक्षणीय बाब म्हणजे हा विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी जवळपास 200 ते 250 पाहुण्यांची उपस्थिती असणार असल्याचे बोलले जात आहे.
शार्दुलची होणारी बायको मिताली ही एक महिला व्यावसायिक आहे. ती ठाण्यात 'ऑल द बेक्स' नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. मिताली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
शार्दुल आणि मिताली यांचा विवाह महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार असल्याचेही मितालीने सांगितले. 'मी सध्या डिझायनर्सना फायनल करत आहे. मला खात्री आहे की मी विवाह सोहळ्यात नऊवारी साडी नेसेन', असेही तिने सांगितले.
शार्दुल ठाकूर आणि मिताली परूलकर यांचा मुंबईत 29 नोव्हेंबर 2021 रोजी साखरपुडा झाला होता. यावेळी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा देखील उपस्थित होता.
शार्दुल ठाकूर मितालीला बरेच दिवस डेट करत आला आहे. शार्दुल ठाकूर याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 8 कसोटी, 31 वन डे आणि 25 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 27, 44 आणि 33 बळी घेतले आहेत.