Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग

भारत-पाक हायहोल्टेज सामना; ड्रामा अन् बरंच काही!

भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण तापले असताना २०२५ मध्ये ८ वेळा दोन्ही देशांतील संघ ८ वेळा समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. हायहोल्टेज सामन्याच्या उत्सुकतेशिवाय यावेळी आशिया कप स्पर्धेतील नो हँडशेक मुद्दा चांगलाच गाजला.

टी-२० प्रकारात दुबईच्या मैदानात भारतीय संघाने पाकची जिरवून आशिया कप स्पर्धा जिंकली. पण पाकचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्विकारण्यास भारतीय संघाने साफ नकार दिला. जेतेपद मिळवल्यावरही भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

"ट्रॉफी दिली तर मीच देणार" या नक्वींच्या आडमुठेपणामुळे भारतीयसंघाला स्पर्धा जिंकून ट्रॉफीशिवाय मायदेशी परतावे लागले. हा प्रकार वर्षभरातील सर्वात चर्चित राहिलेल्या मुद्यांपैकी एक होता. सोशल मीडियावर नक्वींना ट्रॉफी चोर असा टॅगही या घटनेनंतर लागल्याचे पाहायला मिळाले.

२०२५ मध्ये वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ पहिल्यांदा समोरा समोर आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघने साखळी फेरतील लढतीत पाकिस्तानचा ६ विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात २४१ धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीनं नाबाद शतकी खेळी साकारली होती.

आशिया कप २०२५ स्पर्धेत दोन्ही संघ तीन वेळा समोरसमोर आले. दुबईच्या मैदानात रंगलेल्या फायनलसह प्रत्येक सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानची जिरवली.

या संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं. सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंच्या काही वादग्रस्त घटनाही घडल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय महिला क्रिकेटसाठी २०२५ हे वर्ष एकदम खास ठरलं. पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणाऱ्या महिला संघाने कोलंबोच्या मैदानात पाकिस्तानी महिला संघाचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले.

रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेत जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ८ विकेट्से पराभवाचा सामना करावा लागला होता.

अंडर १९ आशिया कप स्पर्धेत वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा 'सुपर संडे'चा क्षण आला. भारत पाक यांच्यात फायनलचा सामना रंगला. पण दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानात रंगलेल्या फायनल सामन्यात पाकिस्तानच्या युवा संघाने बाजी मारली.