IND vs SA, Virat vs Dravid: विराट कोहली तिसऱ्या कसोटीत मोडू शकतो राहुल द्रविडचा 'हा' मोठा विक्रम

विराट कोहली दुसऱ्या कसोटीत पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेरच होता.

आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यातील विजयानंतर दुसरा सामना टीम इंडियाला गमवावा लागला. कर्णधार डीन एल्गरने नाबाद ९६ धावांची खेळी करत संघाला दमदार विजय मिळवून दिला.

दुसऱ्या कसोटीत भारतीय फॅन्सना सर्वाधिक उणीव जाणवली ती विराट कोहलीच्या नेतृत्वशैलीची. विराटच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. त्याच्या जागी केएल राहुलला संघात स्थान देण्यात आले होते. पण तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत मात्र विराट संघाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे.

केपटाउन कसोटीत विराट कोहलीला एक मोठा विक्रम खुणावतोय. दक्षिण आफ्रिकेत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीत १४ धावा केल्या तर या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो.

विराटने आतापर्यंत आफ्रिकेत सहा कसोटी खेळल्या असून त्यात ५१ च्या सरासरीने ६११ धावा केल्या आहेत. यात २ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटी विराटला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या डावात ३५ आणि दुसऱ्या डावात १८ अशा त्याच्या दोन्ही खेळी होत्या.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने ११ कसोटींमध्ये ३० च्या सरासरीने आतापर्यंत ६२४ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. भारताने आफ्रिकेत पहिलीवहिली कसोटी द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच जिंकली होती.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने आफ्रिकेत १५ कसोटी सामने खेळले असून त्यात ४६ च्या सरासरीने १ हजार १६१ धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

भारतीय संघ जर यंदाची मालिका जिंकली तर टीम इंडियाची ती ऐतिहासिक कामगिरी ठरेल. भारताने आतापर्यंत आफ्रिकेत २०१०-११ साली कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली होती. तीच भारताची आफ्रिकेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.