रोमांचक अवस्थेत पोहोचलेल्या जोहान्सबर्ग कसोटीमध्ये भारतीय संघान दुसऱ्या डावात २६६ धावा जमवल्या आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग चौथ्या डावात करणं तितकसं सोपं नाही आहे. भारताकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक ५८ धावा अजिंक्य रहाणेने बनवल्या. रहाणे आणि पुजाराने तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी करत संघाला सुस्थितीत पोहोचवले. मात्र एवढ्या चांगल्या योगदानानंतरही अजिंक्य रहाणेला भारतीय संघातून बाहेर ठेवण्याची मागणी केली जात आहे.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने केपटाऊन कसोटीत अजिंक्य रहाणेऐवजी हनुमा विहारी याला खेळवण्याचा सल्ला दिला आहे. गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर आपलं मत मांडताना सांगितलं की, अजिंक्य रहाणेने एक चांगली खेळी केली यामध्ये काही शंका नाही. मात्र जर तुम्ही भविष्याचा विचार केला तर हनुमा विहारीची कामगिरी पाहता त्याला संधी मिळाली पाहिजे.
विराट कोहली संघात परतल्यानंतर हनुमा विहारीला संघातून बाहेरची वाट दाखवली जाता कामा नये. त्याने कठीण प्रसंगी स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. जौहान्सबर्ग कसोटीमध्येही हनुमा विहारीने नाबाद ४० धावांची खेळी केली होती, अशा परिस्थितीत हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे.
जोहान्सबर्ग कसोटीतील दुसऱ्या डावापूर्वी अजिंक्य रहाणेची कामगिरी ही सुमार दर्जाची झाली आहे. त्याची सरासरी २० पेक्षाही कमी आहे. तसेच त्याला संघाबाहेर करण्याची मागणी होत आहे. मात्र जर जोहार्न्सबर्ग कसोटीमध्ये भारतीय संघाने विजय मिळवल्यास अजिंक्य रहाणेला अजून एक संधी मिळू शकते.
अजिंक्य रहाणेबरोबरच चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र गौतम गंभीरच्या मते त्याची कामगिरी तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून चांगली झाली आहे. पुजाराच्या कामगिरीची तुलना रहाणेसोबत करता येणार नाही, पुजाराला अजून एका कसोटीमध्ये संधी दिली गेली पाहिजे.