इशान किशन ( Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या १६१ धावांच्या भागीदारीने भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. इशानचे शतक थोडक्यात हुकले, परंतु श्रेयसने ती उणीव भरून काढली. मोहम्मद सिराजने गोलंदाजीत कमाल करताना ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
रिझा हेंड्रिक्स ( ७४) व एडन मार्कराम ( ७९) या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १२९ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ७ बाद २७८ धावा जोडल्या. वेन पार्नेल व डेव्हिड मिलर यांनी झटपट ४१ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरने १६ धावा करणाऱ्या पार्नेलला बाद केले. मिलर ३५ धावांवर नाबाद राहिला.
भारताचे सलामीवीर पुन्हा अपयशी ठरले. कर्णधार शिखर धवन ( १३) व शुबमन गिल ( २८) यांना अनुक्रमे वेन पार्नेल व कागिसो रबाडा यांनी ४८ धावांवर माघारी पाठवले. इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरला. इशान आज शतक झळकावेल असेच वाटत होते, परंतु माशी शिकंली. बीजॉर्न फॉर्च्युनने त्याची विकेट घेतली. इशान ८४ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांसह ९३ धावांवर माघारी परतला.
इशान व श्रेयस यांनी १६१ धावांची भागीदारी करून आफ्रिकेविरुद्ध वन डेत तिसऱ्या विकेट्ससाठी भारताकडून सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड ( १५८ धावा) यांचा विक्रम मोडला. विराट कोहली व अजिंक्य रहाणे १८९ धावांसह अव्वल स्थानावर आहेत. श्रेयस १११ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने ११३ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४५.५ षटकांत ३ बाद २८२ धावा करून भारताला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
२०२२मध्ये भारताकडून सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणाऱ्या यादीत श्रेयस अय्यर ( ५) अव्वल क्रमांकावर सरकला आहे. सूर्युकमार यादव ( ४), युजवेंद्र चहल ( ३) , शुमबन गिल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, रिषभ पंत ( प्रत्येकी २) हे या क्रमवारीत नंतर येतात. श्रेयसने वन डे व ट्वेंटी-२०त प्रत्येकी २, तर कसोटीत १ मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकला आहे.
वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना नर्व्हस ९० मध्ये बाद होणारा इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला दुसरा भारतीय आहे. यापूर्वी २०११मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये गौतम गंभीर ९७ धावांवर बाद झाला होता.
भारताचा हा कॅलेंडर वर्षातील ३७ वा आंतरराष्ट्रीय विजय आहे. यासह भारताने २०१७च्या स्वतःच्याच विक्रमाची बरोबरी केली. या विक्रमात ऑस्ट्रेलिया ३८ विजयांसह ( २००३) अव्वल स्थानावर आहे. वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करून ३०० सामने जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. यानंतर ऑस्ट्रेलिायने २५७ सामने जिंकलेत.