भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला गेल्या अनेक दिवसांपासून फलंदाजीमध्ये फार मोठी चमक दाखवता आलेली नाही. मात्र तरीही विराटने आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत फलंदाजीला येण्यापूर्वीच एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
विराट कोहलीने सेंच्युरियन पार्क येथील पहिल्या कसोटीत नाणेफेकीबरोबरच हा रेकॉर्ड बनवला आहे. या कसोटीत नाणेफेकीचा कौल विराट कोहलीच्या बाजूने लागला आणि त्याबरोबरच विराट कोहलीच्या नावे हा नवा विक्रम नोंद झाला. आज नाणेफेक जिंकल्याबरोबर विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला.
याबाबतीत विराट कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरुद्दीनने कसोटीमध्ये २९ वेळा नाणेफेक जिंकली होती. तर विराट कोहलीने ६८ कसोटींमध्ये ३० वेळा नाणेफेक जिंकण्याची किमया साथली आहे.
भारताचा माजी कर्णधार असलेल्या मोहम्मद अझरुद्दीनने ४७ कसोटी सामन्यांमध्ये कप्तानी करताना २९ वेळा नाणेफेक जिंकली होती. आता या यादीमध्ये अझरहर विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या स्थानावर आहे. धोनीने ६० कसोटी सामन्यांमध्ये २६ वेळा नाणेफेक जिंकली होती.