India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान लढतींचा रोमांच न विसरण्यासारखा, असा आहे आशिया चषकातील इतिहास

Asia Cup: गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध भिडतील. या दोन संघांमध्ये जेव्हालढत रंगते तेव्हा क्रिकेटप्रेमींमध्ये अनेक रंजक गोष्टी रंगतात. रविवारी रंगणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्याच्या निमित्ताने अशाच काही रोमांचक क्षणांवर टाकलेली एक नजर. 

गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध भिडतील. या दोन संघांमध्ये जेव्हालढत रंगते तेव्हा क्रिकेटप्रेमींमध्ये अनेक रंजक गोष्टी रंगतात. रविवारी रंगणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्याच्या निमित्ताने अशाच काही रोमांचक क्षणांवर टाकलेली एक नजर. 

अख्तर विरुद्ध हरभजन २०१० सालच्या आशिया चषकात पाकिस्तानने दिलेल्या २६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची स्थिती अखेरच्या काही षटकांत नाजूक होती. भारताचा पराभव होणार असे दिसत होते. मात्र, हरभजन सिंगने मोहम्मद आमीरला षटकार ठोकत भारताला विजयी केले होते. भज्जीने शोएब अख्तरलाही षटकार ठोकला होता. त्यावेळी भडकलेला अख्तर भज्जीच्या अंगावर धावून गेला होता. भज्जीने तोडीस तोड उत्तर देत त्याला शांत तर केलेच, पण नंतर विजयी षटकार ठोकत त्याच्या जखमेवर मीठही चोळले

२०१२ सालच्या आशिया चषकात भारत-पाकिस्तान लढता गाजवली ती विराट कोहलीने. नासिर जमशेद (११२)  व मोहम्मद हाफिझ (१०५) यांच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने ५० षटकांत ६ बाद ३२९ धावा केल्या. भारताला हा सामना कठीण जाणार अशीच चर्चा रंगली. मात्र, एकटा कोहली पाकला भारी पडला. त्याने १४८ चेंडूंत १८३ धावांचा तडाखा देत भारताला १३ चेंडू राखून विजयी केले. ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. 

आफ्रिदीचा तडाखा २०१४ साली आशिया चषकात भारताने ८ बाद २४५ धावा केल्या. यानंतर भारतीयांनी पाकला अडचणीत आण. अखेरच्या षटकात पाकला १० धावांची गरज होती. आर. अश्विनने अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर अजमलला बाद केले. पुढच्या चेंडूवर जुनैदने आफ्रिदीला स्ट्राइक दिली. भारताला एका बळीची गरज होती. आफ्रिदीने तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत सामनाच संपविला.  

तुफानी मोहम्मद आमीर २०१६ सालच्या टी-२० आशिया चषकात भारताने पाकच्या फलंदाजीचे कंबरडे मोडताना त्यांचा डाव केवळ १७.३ षटकांत ८३ धावांमध्ये गुंडाळला. भारत सहज बाजी मारणार असे दिसत होते. मात्र, वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने अप्रतिम स्विंग मारा करत अजिंक्य रहाणे (०), रोहित शर्मा (०) आणि सुरेश रैना (१) यांना स्वस्तात बाद केले. परंतु पुन्हा एकदा विराट कोहली खंबीरपणे खेळला आणि त्याने नाबाद ४९ धावा करत भारताला विजयी केले. आमीरचा हा भेदक स्पेल कायम लक्षात राहणारा ठरला. 

गब्बर-हिटमॅन तळपले  २०१८ सालच्या आशिया चषक स्पर्धेत पाकने ५० षटकांत २३७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन (११४) व रोहित शर्मा (१११*) यांनी शतक झळकावत भारताला ६३ चेंडू राखून ९ गड्यांनी विजयी केले.