India vs New Zealand : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडिया आता नव्या सुरुवातीला सज्ज झाली आहे. दी वॉल राहुल द्रविड ( Rahul Dravid) सारखा तंत्रशुद्ध फलंदाजीची जाण असणारा माजी खेळाडू टीम इंडियाला मुख्य प्रशिक्षक म्हणून लाभला आहे आणि विराट कोहलीनंतर आता ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची सूत्र रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
राहुल-रोहित या जोडीवर आता टीम इंडियाचे भविष्यातील हित लक्षात घेऊन पाऊले उचलली जाणार आहेत. रोहितचं वय पाहता तो आणखी ३-४ वर्षच खेळेल, त्यामुळे या हिटमॅनला नवा पर्याय आतापासून शोधला जाऊ शकतो आणि त्याची सुरूवात ही न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेपासून होताना दिसत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघात बीसीसीआयनं ५ ओपनर्सना संधी दिली आहे. रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, व्यंकटेश अय्यर हे ते सलामीवीर आहेत. पण, यांच्यापैकी इशान व वेंकटेश यांचा मधल्या फळीत वापर करून घेतला जाऊ शकतो.
विराटच्या अनुपस्थितीत लोकेश किंवा रोहित तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो आणि मग ऋतुराजच्या खांद्यावर सलामीवीराची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. रोहितचं वय लक्षात घेता टीम इंडियाला पुढचा विचार करून नवीन सलामीची जोडी तयार करायला हवी आणि राहुल द्रविड त्यासाठी ऋतुराजवर विश्वास टाकू शकतो.
२४ वर्षीय ऋतुराजनं इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या पर्वात धडाकेबाज कामगिरी करून ऑरेंज कॅप नावावर केलीय. शिवाय महाराष्ट्राचे नेतृत्व करताना त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही फॉर्म कायम राखला आहे. त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली होती, परंतु दोन ट्वेंटी-२० त त्याला ३५ धावा करता आल्या. पण, सध्याचा फॉर्म पाहता टीम इंडिया त्याच्याकडे भविष्याचा सलामीवीर म्हणून पाहतेय.
आयपीएल २०२१त त्यानं १६ सामन्यांत ४५.३५च्या सरासरीनं व १३६.२६च्या स्ट्राईक रेटनं ६३५ धावा चोपल्या. त्यानं आयपीएलमधील पहिले शतकंही याच पर्वात आणि तेही अखेरच्या चेंडूवर षटकार मारून दिमाखात साजरे केले. त्यानं फॅफ ड्यू प्लेसिस व लोकेश राहुल या दिग्गजांनाही मागे टाकलं होतं. ऋतुराजच्या फलंदाजीच्या शैलीत रोहितसारखाच दम दिसतो. त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचे महेंद्रसिंग धोनीनंही कौतुक केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
India vs New Zealand Schedule 2021 - पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१, जयपूर; दूसरा ट्वेंटी-२० - १९ नोव्हेंबर, २०२१, रांची; तिसरा ट्वेंटी-२० - २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकाता.