अहमदाबादमध्ये सध्या भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. येथील एका हॉटेलनं देखील क्रिकेटच्या प्रेमापोटी एक खास ५ फुटांच्या भव्य थाळीचा आपल्या मेन्यूमध्ये समावेश केला आहे. या थाळीला 'मोटेरा थाळी' असं नाव देण्यात आलं आहे.
'मोटेरा थाळी'त तुम्हाला 'धोनी खिचडी', 'कोहली खमन', 'भुवनेश्वर भरता', 'रोहित आलू रसीला', 'हरभजन हांडवो', 'बाऊन्सर बासुंदी', 'बुमहार भिंडी शिमलामिर्च', अशा हटके डीशचा समावेश आहे.
अहमदाबादच्या कोर्टयार्ड बाय मॅरियट हॉटेलमध्ये ही क्रिकेट स्पेशल डिश ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलनं 'मोटेरा चॅलेंज' देखील सुरू केलं आहे.
'मोटेरा चॅलेंज'मध्ये ग्राहकाला ५ फुटांची ही संपूर्ण डिश एका तासाच्या आत संपवायची आहे. यासाठी तो आपल्या कुटुंबीयांची देखील मदत घेऊ शकतो. एका तासात संपूर्ण डीश फस्त केल्यास विजेत्यास आकर्षक पारितोषिक देखील ठेवण्यात आलं आहे.