लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाचा पराभव झाला. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या तासापर्यंत भारतीय संघाची सामन्यावर पकड होती, पण फलंदाजांची हाराकिरी भारताला नडली. इंग्लंडने २२ धावांनी सामना जिंकत मालिकेत २-१ने आघाडी घेतली. जाणून घेऊया टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणे
टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण शुभमन गिलचा दृष्टिकोन. गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके आणि एक द्विशतक झळकावणारा गिल लॉर्ड्स कसोटीत पुरता फ्लॉप ठरला. तो इंग्लंडच्या फलंदाजांशी भांडताना दिसला, पंचांवर रागावताना दिसला पण फलंदाजीत त्याने पहिल्या डावात १६ आणि दुसऱ्या डावात अवघ्या ६ धावा केल्या.
टीम इंडियाच्या पराभवाचे दुसरे मोठे कारण म्हणजे ऋषभ पंतचा रनआऊट. पहिल्या डावात ७४ धावांवर असताना राहुलच्या शतकासाठी तो धावबाद झाला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली नाही. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ फक्त ३८७ धावाच करू शकले.
टीम इंडियाने आक्रमक खेळ केला. पण लॉर्ड्सवर अतिआक्रमकतेमुळे संघाला फटका बसला. राहुल, जाडेजा, नितीश रेड्डी, गिल, सिराज सर्वजण इंग्लिश खेळाडूंशी भांडले. त्यात भारतीय गोलंदाजांनी दोन डावांमध्ये एकूण ६३ अतिरिक्त धावा दिल्या, जे इंग्लंडच्या गोलंदाजांच्या दुप्पट आहे. त्याच धावा नंतर महागड्या ठरल्या.
पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडइतक्याच ३८७ धावा केल्या. या धावा खूप जास्त असू शकल्या असत्या, पण भारतीय संघाने पहिल्या डावात शेवटच्या ४ विकेट्स फक्त ११ धावांमध्ये गमावल्या. टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांच्या झटपट बाद होण्याने संघाचे नुकसान झाले.
पहिल्या डावात केएल राहुलने इंग्लंडचा यष्टीरक्षक जेमी स्मिथचा झेल सोडला, त्यावेळी तो फक्त ५ धावांवर खेळत होता. त्यानंतर स्मिथने आणखी ४६ धावा जोडल्या आणि ५१ धावांची खेळी केली. त्यामुळेच इंग्लंडला ३८७ धावांपर्यंत पोहोचता आले. अन्यथा भारताला पहिल्या डावात थोडी आघाडी मिळू शकली असती.