भारतीय संघ आणि इंग्लंडचा क्रिकेट संघ यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. दुसरा कसोटी सामना अनेक कारणांमुळे चर्चेत आहे.
शुभमन गिलची ऐतिहासिक २६९ धावांची खेळी, हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथची ३०३ धावांची भागीदारी आणि मोहम्मद सिराजने ६ बळी मिळवत केलेली घातक गोलंदाजी यामुळे हा सामना संस्मरणीय बनला आहे.
पण या कसोटीत आणखी एक मनोरंजक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा कॅमेऱ्यामध्ये एक 'मिस्ट्री गर्ल' हसत हसत जसप्रीत बुमराहकडे पाहताना कैद झाली. तो फोटो व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर त्या मुलीचीच चर्चा आणि शोध सुरू आहे.
हे दृश्य इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या २६ व्या षटकानंतरचे आहे, जेव्हा कॅमेरा बुमराहपासून काही अंतरावर बसलेल्या महिलेकडे गेला. त्या महिलेच्या चेहऱ्यावर हलके हास्य होते आणि ती टीम इंडियाच्या ट्रेनिंग जर्सीमध्ये डगआऊटमध्ये बसलेली दिसली.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी या 'मिस्ट्री गर्ल'ची ओळख जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली. काही काळानंतर त्या महिलेचे नाव समोर आलेय ही महिलेचे नाव यास्मिन बदियानी ( Yasmin Badiani ) असल्याचे उघड झाले.
यास्मिन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) ऑपरेशन्स विभागाशी संबंधित आहे. वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डानेच यास्मीन हिला या भारत दौऱ्यादरम्यान भारतीय संघाशी समन्वय साधण्यासाठी विशेषत्वाने नियुक्त केले आहे.
यास्मीनच्या कामात ट्रेनिंगचे शेड्युलिंग, लॉजिस्टिक्स आणि इतर गोष्टींचे व्यवस्थापन समाविष्ट आहे. म्हणूनच ती टीम इंडियाच्या ट्रेनिंग जर्सीमध्ये दिसते. यास्मिनची कारकीर्द देखील खूप प्रभावी राहिली आहे.
तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती यापूर्वी फिझ लिमिटेड आणि ओआरएस स्पोर्ट सारख्या कंपन्यांमध्ये 'हेड ऑफ स्पोर्ट' राहिली आहे. तसेच लेस्टर सिटी फुटबॉल क्लबमध्ये (२०१०-२०१३) स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणूनही काम केले आहे.
जसप्रीत बुमराह या कसोटीत खेळत नसल्याने डगआऊटमध्ये बसला आहे. कारण त्याला रोटेशन अंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. याचदरम्यान यास्मीनचे स्मितहास्य आणि कॅमेऱ्याने टिपलेला क्षण चाहत्यांमध्ये चर्चेचा एक नवीन विषय बनला आहे.