भारतीय संघाचे पाकिस्तानवरील वर्चस्व गौतम गंभीरला 'खटकतेय'! म्हणतो, हे बरं नाही

भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ८-० अशी अपराजित मालिका कायम राखली. १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे झालेल्या लढतीत भारताने ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. पण, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याने या विजयानंतर चिंता व्यक्त केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या विषमतेवर चिंता व्यक्त केली आहे. २०११ च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्याचा असा विश्वास आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे सध्याचे वर्चस्व उपखंडीय क्रिकेटसाठी अनुकूल नाही.

भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला. अब्दुल्ला ( २०), इमाम-उल-हक ( ३६), कर्णधार बाबर आजम ( ५०) आणि मोहम्मद रिझवान ( ४९) यांच्यामुळे संघ एकवेळेस २ बाद १५५ अशा मजबूत स्थितीत होता. पण, पुढील ३६ धावांत त्यांचे ८ फलंदाज माघारी पाठवले आणि भारताने सामन्यावर पकड घेतली.

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्माने ६३ चेंडूंत ८६ धावांची वादळी खेळी केली आणि श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताला ३०.३ षटकांत ३ बाद १९२ धावा करून विजय मिळवून दिला.

"पाकिस्तानवर भारताचे वर्चस्व दिसून येते. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये असा एकतर्फी निकाल लागणए ही दुर्मिळ घटना आहे. पूर्वी पाकिस्तान वरचढ ठरत असे, परंतु अलीकडच्या काळात भारताने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ही परिस्थिती उपखंडीय क्रिकेटसाठी आदर्श नाही. भारत-पाकिस्तान मालिका प्रचंड स्पर्धात्मक असेल असा आमचा नेहमीच अंदाज होता, परंतु सध्या दोन्ही संघांमध्ये लक्षणीय अंतर दिसतेय," असे गंभीरने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

पाकिस्तानविरुद्ध वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या कामगिरीचेही गंभीरने कौतुक केले. संघात हे दोन गोलंदाज असणे हा कोणत्याही कर्णधारासाठी महत्त्वाचे असते. त्याने जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांच्यातील तुलनेवरही मत मांडले.

"कोणत्याही कर्णधाराकडे जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव असतील तर ती खूप मोठी लक्झरी आहे. ५० षटकांपैकी तुम्हाला २० षटके गोलंदाजांकडून मिळतात जे तुम्हाला केव्हाही विकेट देऊ शकतात. तुम्ही बुमराहची तुलना शाहीनशी करत होता. पण, तशी तुलना होऊ शकत नाही,” असे गंभीरने स्पष्ट केले.

भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ ३ सामन्यांत ४ गुण व -०.१३७ नेट रन रेटसह चौथ्या स्थानी सरकला आहे. त्यांचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० तारखेला होणार आहे.