लोकेश राहुलने रचला इतिहास! नोंदवला खास विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

Lokesh Rahul, IND vs SA, 1st T20I: भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल हा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतला आहे. गेल्या ५ सामन्यात त्याने ३ अर्धशतके ठोकली आहेत. दरम्यान, त्याने अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. त्याबरोबरच राहुलने एक खास विक्रम नोंदवत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल हा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतला आहे. गेल्या ५ सामन्यात त्याने ३ अर्धशतके ठोकली आहेत. दरम्यान, त्याने अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. त्याबरोबरच राहुलने एक खास विक्रम नोंदवत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे.

लोकेश राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संघ अडचणीत असताना नाबाद ५१ धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघ हा सामना आठ विकेट्स राखून जिंकण्यात यशस्वी ठरला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेली अर्धशतकी खेळी ही राहुलची टी-२० क्रिकेटमधील १९ वी अर्धशतकी खेळी ठरली. तसेच त्याने दोन शतकेही ठोकली आहेत. दरम्यान, लोकेश राहुलने ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सुमारे ४० च्या सरासरीने २०८० धावा काढल्या आहेत.

भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये लोकेश राहुल हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत रोहित शर्मा पहिल्या. तर विराट कोहली हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जागतिक क्रमवारीतही रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर लोकेश राहुल हा १६ व्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी करत लोकेश राहुलने विराट कोहली आणि रोहित शर्माचा एक खास रेकॉर्ड तोडला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही आतापर्यंत १० वेगवेगळ्या संघांविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये अर्धशतकी खेळी केली होती. मात्र कालच्या सामन्यात लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी केली. ही त्याची ११व्या संघांविरुद्धची अर्धशतकी खेळी ठरली, अशा प्रकारे लोकेश राहुल हा ११ संघांविरुद्ध अर्धशतके ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

लोकेश राहुलने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी तीन अर्धशतके फटकावली आहेत. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी दोन तर बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, नामिबिया, स्कॉटलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी एक अर्धशतक ठोकलं आहे.

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकामध्येही लोकेश राहुल भारतासाठी सलामीला खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याचं फॉर्ममध्ये परतणं भारतीय संघासाठी शुभसंकेत आहेत.