कालचा दिवस भारतीयांसाठी खूपच खास होता. दिवाळीचा मुहूर्त आणि पारंपरिक शत्रू पाकिस्तानसोबत क्रिकेटची मॅच. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील रस्ते ओस पडले होते. साऱ्यांच्या नजरा मॅचकडे लागल्या होत्या. पाकिस्तानच्या दोन विकेट अस्सल भारतीय अर्शदीप उडविल्या आणि पाकिस्तानींच्या पायाखालची वाळूच सरकली होती. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी ठरला. भारत जिंकला, पण खरी मॅच तिकडे सोशल मीडियावर सुरु झाली होती. यात गुगलचे सीईओ सुंदर पिचई तरी कसे मागे राहतील.
भारताने तीन ओव्हरमध्ये ४८ धावा कुटल्या आणि सुंदर पिचईंचे पहिले ट्विट पडले. त्यांनी या ट्विटमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच त्यांनी अखेरच्या तीन ओव्हर पाहून ते दिवाळी साजरी करत असल्याचे म्हटले. 'दिवाळीच्या शुभेच्छा! आशा आहे की तुम्ही जे हा उत्सव साजरा करत आहात त्यांनी तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला आहे. शेवटची तीन षटके पाहून मी आज पुन्हा सेलिब्रेशन केले, काय मॅच होती.', असे पिचईंनी ट्विट केले.
हे ट्विट पाहून पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल करावेसे वाटले. त्याने तीन षटकांचा हवाला देत सुरुवातीची तीन षटके पहायला हवी होती, असे म्हटले. मोहम्मद शाहझैबच्या ट्विटला सुंदर पिचईंनी फार सुंदर उत्तर दिले. या उत्तरावर त्या पाकिस्तानी फॅनची बोलतीच बंद झाली.
पिचईंनी लगेचच म्हटले, ''हो पाहिली ना! भुवी आणि अर्शदीपने काय स्पेल टाकले''. बास सुंदर पिचईंनी त्या पाकिस्तानी फॅनला मॅचच्या सुरुवातीची पहिली तीन षटके आठवण करून दिली. बाबर आझम शून्यावर बाद झाला होता, पाकिस्तानची स्थिती २ बाद १५ अशी झाली होती. याचीच आठवण पिचई यांनी करून देत पाकिस्तानी फॅनची जोरदार पिटाई केली.
यावरून सोशल मीडियावर भारतीय फॅननी या तीन-तीन ओव्हरचा निकालच लाऊन टाकला.