आशिया कप २०२५ च्या ग्रुप स्टेज सामन्यात १४ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आज स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
भारतीय संघ १० आणि १९ सप्टेंबर रोजी अनुक्रमे युएई आणि ओमानविरुद्ध देखील खेळणार आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा रंगलेली आहे.
यंदाच्या वेळापत्रकातील एक विशेष बाब म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ स्पर्धेत एकदा नव्हे तर तब्बल तीनवेळा एकमेकांसमोर येऊ शकतात, कसे ते समजून घ्या.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने, ते साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध सामना खेळतील. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, हा सामना १४ सप्टेंबरला होईल.
गटातील टॉप-२ संघ सुपर ४ टप्प्यासाठी पात्र ठरतील. या गटात युएई आणि ओमान हे संघ आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान 'सुपर ४' मध्ये एकमेकांसमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुपर ४ टप्प्यात सर्व संघ एकमेकांसमोर येतील. या टप्प्यानंतर, पॉइंट टेबलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे अव्वल दोन संघ असतील तर त्यांच्यात फायनलचा सामना २८ सप्टेंबरला होईल.