न्यूझीलंड क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत बलाढ्य टीम इंडियाची त्यांच्यात घरात जाऊन शिकार केली. न्यूझीलंडविरुद्ध भारताची कामगिरी अत्यंत खराब राहिली, ज्यावरुन बरीच टीका होत आहे.
बंगळुरू आणि पुणे कसोटीनंतर भारताने मुंबई कसोटीही गमावली. परिणामी यजमानांना घरच्या मालिकेत ३-० असा असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वातील भारताने प्रथमच कसोटी मालिका गमावली.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरचा आतापर्यंतचा कार्यकाळ अत्यंत निराशाजनक राहिला असून आता त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ नंतर मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली. गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये भारताने आतापर्यंत तीन लाजिरवाण्या विक्रमांची नोंद केली आहे.
गौतम गंभीर आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचे तीनही सामने गमावले. टॉम लॅथमच्या नेतृत्वातील पाहुण्या संघाने या मालिकेतील पहिला सामना जिंकून ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला.
यानंतर न्यूझीलंडने मुंबई कसोटी जिंकून भारतीय चाहत्यांना मोठा धक्का दिला. याआधी २००० मध्ये भारताचा व्हाईटवॉश झाला होता. त्यानंतर तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा घरच्या मैदानावर व्हाईटवॉश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत घरच्या मैदानावर मजबूत संघ बनला आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नाही.
पण, न्यूझीलंडने या मालिकेला ब्रेक लावत इतिहास रचला. त्यामुळे भारताचा विजयरथ रोखत किवी संघाने इतिहास रचला.
मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या पहिल्या मालिकेत, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. श्रीलंकेने तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव केला. २७ वर्षात श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा पहिलाच वन डे मालिका पराभव ठरला.